पिंपरी-चिंचवड : उच्चक्षमता द्रुतगती मार्गामुळे बाधित होत असलेल्या नागरिकांची घरे वाचविण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने लढा सुरू आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून समितीने लाक्षणिक उपोषणाचे अस्त्र उपसले असून, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी उपोषण करण्यात येणार आहे. प्राधिकरण पूर्णपणे बरखास्त करावे, कालबाह्य झालेला डीपी रद्द करावा, रिंगरोड रद्द करून नागरिकांची घरे वाचवावीत, शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशा कित्येक मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.
घरे पाडण्यास रहिवाशांचा विरोध
’एचसीएमटीआर’ (रिंगरोड) रस्त्यामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, बळवंतनगर, थेरगाव आणि पिंपळेगुरव परिसरातील दोन हजारांहून अधिक घरे पाडली जाणार आहेत. घरे पाडण्यास रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. परंतु, प्राधिकरणाने रिंगरोडवरील दुकाने खाली करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. घरे वाचविण्यासाठी आजवर समितीकडून कोपरासभा, महिला मेळावा, प्राधिकरण कार्यालयावर दिंडी मोर्चा, महापालिकेवर मोर्चा, पोस्टकार्ड पाठवा अभियान, अशी कित्येक आंदोलने करण्यात आली. सरकारकडून अजूनही सकारात्मक आश्वासन मिळत नसल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले जात आहे.