रावेत : पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. घरे वाचविण्यासाठी समितीने सुरू केलेल्या लढ्यास आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण आणि पोस्टकार्ड पाठवा मोहीम राबवत समितीने लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, या आंदोलनाची अजूनही प्रशासन किंवा शासनाने दखल घेतलेली नाही. 21 जुलै 2017 रोजी निघालेली प्रारूप नियमावली (अधिसूचना) सुद्धा नागरिकांना दिलासा देऊ शकलेली नाही.
सूचना व हरकती नोंदविणे सुरू
गेल्या 30 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. रिंगरोडमुळे यातील अनेक घरे बाधित होत असून, आपले घर जाणार या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. शासनाने 21 जुलैला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, नागरिकांकडून सूचना व हरकती नोंदविण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत घर बचाव संघर्ष समितीकडे पाच हजार सूचना अर्ज आले आहेत. त्यातील प्रमुख सूचना समितीकडून मंत्रालयातील नगरविकास विभागाचे मुख्य प्रधान सचिव यांच्याकडे पाठविल्या जाणार आहेत.
ठिकठिकाणी कोपरा सभा
अधिकाधिक नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती नोंदवाव्यात, याकरिता घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने साईराम कॉलनी, पंचरत्न कॉलनी, बळवंत कॉलनी,शिवप्रसाद कॉलनी, औदुंबर कॉलनी, सोपानबाग कॉलनी या परिसरात कोपरा सभा घेण्यात आल्या. आतापर्यंत बिजलीनगर, गुरुद्वारा परिसर, रावेत, चिंचवडेनगर परिसरात नऊ कोपरा सभा घेण्यात आल्या. सर्वच सभांना नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली.
संयोजनात यांचा हातभार
समिती समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, राजेंद्र देवकर,शिवाजी इबितदार, सचिन काळभोर आदी नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. किरण पाटील, माऊली जगताप, प्रदीप पटेल, शिवाजी पाटील, दत्ता गायकवाड, गणेश सरकटे, राजू पवार, सहदेव वाघमारे, ज्ञानेश्वर महाजन, अमोल पाटील, संतोष चिघळीकर, मुकुंद जाधव, भाऊसाहेब पाटील, कमलाकर गोसावी, माऊली आचारी, शशिकांत औटे, अतुल वरपे, अमोल हेळवर, मोतीलाल पाटील, दीपक बाविस्कर यांनी संयोजन केले.
मदतकेंद्र उभारण्याची गरज
नागरिकांच्या सूचना व हरकती एकाच ठिकाणी जमा करता याव्यात, यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत एक मदतकेंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, समितीकडून कॉलनी महिला प्रतिनिधींची निवड झाली. त्यात रजनी पाटील, आफरिन मुजावर, चंदा गायकवाड, रोहिणी लांडगे, प्रमिला पालवे, मनीषा बनसोडे, रुपाली महाजन, माया वाघमारे, जयश्री शिरसाठ, स्नेहल सूर्यवंशी, वंदना पाटील, दीपाली वारके, निकिता पाटील, शुभांगी कदम, माई सोनवणे यांचा समावेश आहे.