घाटकोपर येथून एमडी ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक

0

मुंबई : घाटकोपर परिसरात एमडी ड्रग्जची तस्करीसाठी आलेल्या चार जणांच्या एका टोळीला घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी काल शिताफीने अटक केली. सन्नी ऊर्फ आसिफ गुलाम अन्सारी, यतीन ललित संघवी, सॅयमूल सुरेशचंद्र पाठक ऊर्फ सॅम आणि दिलविंदर अजमेरसिंग ऊर्फ जग्गी सिंग अशी या चौघांची नावे आहेत.

या चौघांकडून पोलिसांनी 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 48 लाख रुपये आहे. या ड्रग्जसह सात लाख रुपयांची एक कारही जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर या सर्वांना येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील घाटकोपर बस डेपोजवळ काही रेकॉर्डवरील गुन्हेगार एमडी ड्रग्जची देवाणघेवाण करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सावंत, बबन सानप, एकाडे, हुंबे, दगडे, कांबळे, वाघ, भोसले, सोनावणे, अदकमोल, भिंगारदेवे, योगिता शिंदे, रेखा चौधरी यांनी काल दुपारपासून तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी पावणेपाच वाजता तिथे एक मारुती सुझुकी स्विफ्ट कार (एमएच02-सीएच-6774) आली.

या कारमधून दोनजण उतरले. काही वेळाने तिथे अन्य दोन तरुण आले. या चौघांची हालचाल संशयास्पद वाटताच या पथकाने चारही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या अंगझडतीत तसेच कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांना 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला. या ड्रग्जसह कार पोलिसांनी जप्त केली असून त्याची किंमत सुमारे 55 लाख रुपये आहे. यातील सन्नी आणि यतीन या ड्रग्ज तस्करीतील प्रमुख आरोपी असून सन्नीचा मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यतीन हा केमिकल आणि फार्मा एजंट म्हणून काम करतो. सॅम हा बेरोजगार तरुण असून दलविंदरसिंग हा एसी मॅकनिक म्हणून कार करतो. सॅम गुजरातच्या बडोदा, दलविंदसिंग पंजाब तर इतर दोघेही अंधेरी आणि घाटकोपरचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या चौघांनाही आज दुपारी पोलीस बंदोबस्तात येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी न्यायालयाने त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्जची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. जप्त केलेले एमडी ड्रग्ज पंजाब आणि गुजरात येथून मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आले होते. गेल्या 45 दिवसांत अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी 21 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेचार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. गेल्या वर्षी या अधिकार्‍यांनी सव्वातीन किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता, त्याची किंमत 66 लाख रुपये होती.