मुंबई । घाटकोपरमधील बेस्ट बस डेपो परिसरात असणार्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली. या कारवाईत 99 व्यवसायिक स्वरुपाची व 6 निवासी आणि 17 झोपड्यांचा समावेश आहे. हा मोकळा झालेला 50 हजार चौरस फूटांचा भूखंड पालिका घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगानें कचरा विलगिकरणासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली.
मोकळा झालेला भूखंड कचरा व्यवस्थापनासाठी
सर्व्हे क्रमांक 65 तसेच नगर भूमापन क्रमांक 1 बी / 1 या बेस्ट उपक्रमाच्या या भूखंडावरुन अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिनी जात असल्याने या भूखंडावर पक्के बांधकाम करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात या भूखंडावर मोठ्या प्रमाणात व्यवसायिक व निवासी स्वरुपाची अतिक्रमणे उद्भवली होती. ही सर्व अतिक्रमणे महापालिकेच्या एन विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली. परिमंडळ – 6 चे उपायुक्त नरेंद्र बरडे यांच्या मार्गदर्शनानुसार ’एन’ विभागाच्या पथकाद्वारे ही कारवाई केली. या कारवाईसाठी महापालिकेचे 130 कामगार-कर्मचारी-अधिकारी, मुंबई पोलीस दलाचे 30 पोलीस कर्मचारी तैनात होती. तसेच 4 जेसीबी, 1 पोकलेन मशीन यासह इतर वाहनांचादेखील वापर करण्यात आल्याचे कापसे यांनी सांगितले.
कचरा विलगिकरणासाठी भूखंड देणार
सदर भूखंडावरील अतिक्रमणांबाबत न्यायालयाचा स्थगिती आदेश होता. या आदेशानुसार पालिका ’एन’ विभागाने पाठपुरावा करुन हा स्थगिती आदेश खारिज करुन घेतला. पालिकेने यानंतर मंगळवारी कारवाई केली. लवकरच या भूखंडाभोवती कुंपण घालण्यात येऊन या भूखंडाचा वापर कचरा विलगिकरणासाठी देण्याचा विचार आहे.