घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद – सभागृह तहकूब 

0

मुंबई- घाटकोपर येथील साई दर्शन इमारत २५ जुलैला पडल्याच्या घटनेचे तीव्र  पडसाद आज  विधानसभेत उमटले. संतप्त विरोधी सदस्यांनी तात्काळ याविषयी चर्चा सुरू करा अशी मागणी लावून घेतली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना गदारोळामुळे दोनदा व एकदा प्रश्नोत्तराशींबंधीत मंत्री सभागृहात नसल्य़ामुळे कामकाज तहकूब करावे लागले. प्रश्नोत्त्रर तासानंतर घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणावर चर्चा सुरू झाली.

सभागृहाचे  कामकाज चालू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपण   स्थगनची सूचना दिल्याचे निदर्शनास आणले. प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करून तातडीने स्थगन प्रस्ताव स्विकारून   चर्चा  सुरू करावी आणि त्यावर शासनाने निवेदन सादर करावे, अशी मागणी  त्यांनी केली.  राष्ट्रवादी कांग्रेसचे  अजित पवार यांनी  त्याला समर्थन दिले. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती मान्य केली नाही व प्रश्नोत्तरे पुकारली.  ‘स्थगन प्रस्ताव स्वीकारला असून त्यावर दुपारी ४ वाजता चर्चा करू’, असे सांगितले. मात्र विरोधी सदस्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.  विरोधक आणि सत्तारूढ  काही सदस्य   यांनीही  चर्चेची मागणी लावून धरली. सभागृहात गदारोळ होत होता.  अध्यक्षांना त्यामुळे  सभेचे कामकाज २ वेळा १० मिनिटांसाठी स्थगित करावे लागले प्रश्नोत्तरे पुकारली गेली तेव्हा संबंधीत मंत्रीच उपस्थित नसल्यामुळे  काही काळ गोंधऴ झाला. त्यामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले. विरोधकांनी लावून धरलेली स्थगनची मागणी आणि गोंधळ यामध्येच प्रश्‍नोत्तराचा तास संपला.