घाटरस्त्याबाबत माथेरानकरांचे एमएमआरडीएच्या आयुक्तांना निवेदन

0

माथेरान । माथेरानच्या घाट रस्त्यातील कामे मागील दीड वर्षांपासून सुरू आहेत. परंतु ही कामे अधिक योग्य आणि पारदर्शी पद्धतीने व्हावीत. यासाठी या कामांविषयी बारकाईने लक्ष केंद्रित करून कामे कशाप्रकारे व्हावी या आशयाचे लेखी निवेदन माथेरानमधील राष्ट्रीय कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांच्या वतीने माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर आणि नगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते शिवाजी शिंदे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांना दिले. त्यावेळी सदरची कामे आपल्या मागणीप्रमाणे सुयोग्य पद्धतीने करण्यात येतील. असे आश्‍वासन महानगर आयुक्तांनी दिले आहे. एमएमआरडीएचे अतिरक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनीसुद्धा मुख्य अभियंता ठुबे आणि कार्यकारी अभियंता ढाणेे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून कामांविषयी कडक निर्देश दिले. माथेरानचा घाट रस्ता हा अवघड वळणांंचा असून यासाठी एकूण 36 कोटी रुपयांचा निधी सुयोग्य प्रकारे वापरला पाहिजे. संबंधीत ठेकेदाराने संरक्षण भिंती बांधतानाच ज्या जुन्या संरक्षण भिंती आहेत. त्यावरच काँक्रिटच्या भिंतीचे बांधकाम केले आहे. संरक्षण भिंती या रस्ता मजबुत ठेवण्यासाठी आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या जुन्याच भिंतींवर रस्त्याच्या लेव्हलवर कॉन्क्रीटच्या भिंती बांधत आहेत. जुन्याच भिंतींवरपुन्हा दीड मीटर उंचीच्या भिंती बांधल्या जात असल्याने सभोवतालचा नयनरम्य परिसर यापुढे पर्यटकांना न्याहळता येणार नाही. या कामांची सुरुवात ठेकेदाराने नेरळ पासून केलेली आहे. घाटातील मुख्य कामे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामे न केल्यामुळे पर्यटकांमध्ये उदासीनता आहे.

संरक्षण भिंत बांधणे गरजेचे
जर केवळ अनावश्यक सोप्या कामांवरच हा निधी खर्च झाल्यास पुढील अवघड महत्वाची कामे अपुर्णावस्थेत राहण्याची शक्यता आहे. येथील दस्तुरी पासुनचे दूसरे वळण आणि तिसर्‍या वळणानंतर थोड्या अंतरावर संरक्षण भिंतीची नितांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे वॉटर पाईप रेल्वे स्टेशनच्या खालील बाजूस अति धोकादायक भाग असलेल्या रेल्वे लाईनच्या बाजूस सुद्धा संरक्षण भिंत बांधणेे अधिक गरजेचे आहे. परंतु ही अवघड कामे अद्याप सुरू केलेली नाहीत. या भिंती बांधल्या नाहीत तर पावसाळ्यात रस्ते सुद्धा टिकणार नाहीत. रस्ता खचू नये, ढासळुु नये यांसाठी भिंती बांधणे महत्वाचे आहे. नेरळ पासून जुम्मापट्टी भागात सुद्धा जुन्याच पूर्वी अस्तित्वात असलेल्या भिंतींवर रोड लेव्हलच्या वर दीड मीटर उंचीची कोंक्रीटच्या भिंती काहीच गरज नसतांना बांधल्या आहेत. केवळ निविदेतील कोंक्रीटची क्वांटीटी संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सदरची अनाठायी कामे त्वरित थांबविण्यात यावी असेही निवेदनात नमूद केले आहे.