अपहार भोवला ; सहा लाखांच्या शासकीय निधीचा केला अपहार
भुसावळ- बोदवड तालुक्यातील घाणखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवकाला शासकीय निधीचा अपहार भोवला असून दोघांविरुद्ध मंगळवारी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बोदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (29, रा. जळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून
घाणखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत वसंत वाघोदे व तत्कालीन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांनी 1 एप्रिल 2016 ते 15 डिसेंबर 2016 दरम्यान सहा लाख दोन हजार 10 रुपयांचा अपहार केला. आरोपींनी संगनमत करून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या शासकीय निधीतील पाच लाख 82 हजार 446 रुपयांचा तात्पुरत्या पाणी योजनेचा निधी तसेच 19 हजार 564 रुपयांचा ग्रामनिधी व पाणी वाटप निधी असा एकूण सहा लाख दोन हजार 10 रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक सतीश भामरे करीत आहेत.