लोणावळा : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेला एक युवकाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धबधब्याच्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू होण्याची या एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारीच भुशी धरणाच्या मागील बाजूस असणार्या धबधब्याच्या पाण्यात पडून एक युवकाचा मृत्यू झाला होता.
20 फूट खोल खड्डयात पडला
धवल विजय परमार (वय 26, रा.अंधेरी, मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान धवल हा आपल्या मित्र मैत्रिणी सोबत लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी आला होता. हे सर्व मित्र भुशी डॅमच्या पुढे असलेल्या टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या खाली असलेल्या धबधब्यात उतरले होते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धबधब्याखाली असणार्या पाण्याने भरलेल्या सुमारे 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात धवल हा पडला. त्यानंतर दिनेश कोकरे, दिनेश मरगळे आणि राजू हिरवे या स्थानिक युवकांच्या मदतीने लोणावळा शहर पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अखेर दुपारी 12 वाजता धवल याचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले.
माहिती नसलेल्या ठिकाणी जाऊ नका
शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांनी धवल याचा मृतदेह धबधब्यातून उचलून वर आणला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे. पर्यटनासाठी अनेकदा उत्साहाच्या भरात तरुणवर्ग माहीत नसलेल्या ठिकाणी उतरतात आणि मग त्यांना असल्या दुर्घटनांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांनी अशा कोणत्याही स्थळावर जाऊ नये ज्याबाबत त्यांना काहीही माहिती नाही.