घुसखोरीसाठी पाकिस्तान घेतेय छोट्या मुलांची मदत

0

जम्मू । जम्मू काश्मीरमध्ये घातपाताच्या कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून रोज नवनवीन फंडे अजमावले जात आहेत. घुसखोरी करण्याआधी संबंधीत विभागाची रेकी करण्यासाठी पाकिस्तान आता अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. जम्मूमधील राजौरीतील नौशेरा सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ संशयास्पदरित्या वावरणार्‍या एका 12 वर्षाच्या मुलाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हा मुलगा भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सर्जिकल स्ट्राइक केलेल्या पाकिस्तानातील भीमजेर जिल्ह्यातील आहे. संरक्षण दलाचे प्रवक्ता कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भारतीय जवानांनी 12 वर्षाच्या घुसखोराला पकडले आहे. अशफाक अली चौहान असे नाव असलेल्या हा मुलगा बुधवारी रात्री उशिरा नियंत्रण रेषा ओलांडून रजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसला होता. अशफाक हा नियंत्रण रेषेजवळ संशयास्पदस्थितीत फिरत होता. त्यामुळे गस्तीपथकाने त्याला हटकल्यावर त्याने स्वत:ला जवानांच्या स्वाधीन केले. भारतीय हद्दीत नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाला पाठवून पाकिस्तानने मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन केले असल्याचेही मेहता यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याशी हातमिळवणी करून भारतात घुसण्यासाठी सोपा मार्ग शोधण्यासाठी या मुलाला पाठवले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानने यावर्षी आतापर्यंत 65 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यातील 40 वेळा याच नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली होती.

निवृत्त सैनिकाचा मुलगा
भारतीय अधिकार्‍यांनी अशफाककडे चौकशी केली असता, तो पाकिस्तानच्या बलूच रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या हुसैन मलिक या निवृत्त सैनिकाचा मुलगा असल्याचे त्याने सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमधील भीमजेर जिल्ह्यातील समानी गावातील डुंगरपेल येथील तो रहिवासी आहे. याच भीमजेर जिल्ह्यात भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सर्जिकल स्ट्राईक केले होते. पुढील चौकशीसाठी अशफाकला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोदीकडूनच अपेक्षा
काश्मीरमध्ये चिघळत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच काश्मिरी जनतेला दलदलीतून बाहेर काढू शकतात, असे मेहबुबा यांनी सांगितले. मेहबुबा म्हणाल्या की, काश्मीरमधील परिस्थिती आणखी चिघळली तर त्याचे पडसाद जम्मू आणि लडाखमध्येही उमटतील. माझे वडील मुफ्ती मोहम्मद सईद आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी काश्मीरमध्ये शांतिप्रक्रिया सुरू केली होती. काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे, असे युपीए सरकारला वाटत होते, पण आता खूपच वाईट स्थिती आहे. या परिस्थितीतून येथील जनतेला केवळ मोदीच बाहेर काढू शकतात. ते जो काही निर्णय घेतील, त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल. याआधीचे पंतप्रधान पाकिस्तानला भेट देण्यास इच्छुक होते पण त्यांनी हिंमत दाखवली नाही. मोदी लाहोरला जाऊन आले, ही त्यांची ताकद आहे.