घुसखोरी करणारे 6 दहशतवादी ठार

0

श्रीनगर । भारतीय लष्कराने काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मागील तीन दिवसातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा पाचवा प्रयत्न हाणून पाडला. जवानांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून मागील तीन दिवसात मारल्या गेलेल्या घुसखोरांची संख्या 14 झाली आहे.

याबाबत माहिती देताना लष्कराच्या अधिकार्‍याने सांगितले की, सीमेपलीकडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. जवानांकडून उरीमध्ये घुसखोर विरोधी अभियान चालवले गेले. यादरम्यान 6 दहशतवाद्यांना टिपण्यात आले. सैनिकांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले परंतु त्यांनी गोळीबार सुरू केल्याने प्रत्युत्तरादाखल सैनिकांनाही गोळीबार करावा लागला. या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सैनिकांनी मागील 24 तासांत नियंत्रण रेषेजवळ अनेक सेक्टरमध्ये सीमेपलीकडून घुसखोर भारतीय हद्दीत पाठविण्याचा पाक लष्कराचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मागच्या 72 तासांपासून घुसखोरी करणार्‍या 14 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अजूनही सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरूच आहे. मागील अनेक दिवसांपासून दशहतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

काश्मीरमध्ये आता महिला जवान
काश्मीर्‍यातील वातावरण अशांत रहावे म्हणून फुटीरवादी संघटनांच्या आंदोलनात महिलांचा ढालीसारखा वापर केला जात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडून एका नवीन पर्याय अवलंबवला जाणार आहे. त्यासाठी लवकरच भारतीय सैन्याम महिला जवानांची भरती करण्यात येणार आहे, असे भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. लष्कर प्रमुख शनिवारी इंडियन मिलिटरी कॅडमीमध्ये पासिंग आऊट परेडनिमित्त डेहराडून येथे आले होते. यावेळी संबोधित करताना त्यांनी भारतीय लष्करात महिला जवानांची गरज व्यक्त केली. सध्या सैन्यामध्ये अधिकारी पदावर महिला कार्यरत आहेत. मात्र काश्मीरमधील परिस्थिती पाहता महिलांची जवान म्हणूनही आवश्यकता आहे, असे रावत म्हणाले. समाज माध्यमांवर अफवा पसरवून तरुणांना भडकवले जात आहे. काश्मीरमधील जे तरुण भरकटत आहेत. त्यांनी हत्यार टाकून सैन्याला सहकार्य करावे आणि काश्मीरमध्ये सैन्याच्या शांती स्थापित करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे रावत यांनी पुन्हा एकदा आवाहन केले.