श्रीनगर : भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणार्या चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. रविवारी रात्रीच्या अंधारात जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान, भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
काही दहशतवादी कुपवाडामधील केरनमध्ये भारतात घुसखोरी करत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार केला. गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. या घटनेनंतर या भागात सैन्याने शोधमोहीम सुरू केली होती.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करते. 2016 मध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ तब्बल 228 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.