पुणे । ‘बगळ्यांची माळ फुले… राधा धर मधु मिलिंद जय जय… तोच चंद्रमा नभात… लक्ष्मीवल्लभा… अशा विविध शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन अशा गान प्रकारांच्या सुरेल सादरीकरणाने प्रत्यक्ष स्वरगंधर्व मंचावर गायन करीत असल्याची अनुभूती रसिकांनी घेतली. प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या कसदार गायकीने घेई छंद कार्यक्रमातून रसिकांवर स्वरवर्षाव केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये घेई छंद… हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर झालेल्या मारवा रागातील ये मदमती चली चमकत… बोलन बिन कबहु चैन… या बंदिशींना रसिकांनी दाद दिली. यानंतर अष्टविनायक चित्रपटातील वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या दाटून कंठ येतो… या गीताने रसिक भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. मानापमान नाटकातील रवी मी… या पदानेश्रोत्यांची मने जिंकली.
मैफलीत शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीतातील स्वरांविषयी व शब्दोच्चारांविषयी देशपांडे यांनी माहिती दिली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सूर निरागस हो… या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. घेई छंद मकरंद… या पदाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीत कानडा राजा पंढरीचा… या भजनाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. आदित्य ओक (हार्मोनिअम), प्रशांत पांडव (तबला), गंभीर महाराज(पखवाज), भूषण माटे (गिटार) यांनी साथसंगत केली.