घेतलेली शास्तीकराची रक्कम परत करा

0
निगडीतील त्रस्त नागरिकांची मागणी 
निगडी : पिंपरी-चिंचवड महापालिका ‘नफा कमविणारी कंपनी नसून ती समाजसेवेसाठी स्वायत्त संस्था’ आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शहरातील ज्या नागरिकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरला आहे. ती रक्कम त्यांना परत करण्यात यावी. अथवा पुढील घरपट्टीमधून वसूल करावी. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 99 वर्षाचा भाडेकरार रद्द करुन जागेची मालकी सोसायटीला किंवा वैयक्तीक सुपूर्द करावी, अशी मागणी  निगडीतील त्रस्त नागरिक शांताराम बो-हाडे, मिलिंदकुमार रणदिवे यांनी केली आहे. तसेच एक महिन्यात या मागण्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा अहिंसकमार्गाने शहरव्यापी आंदोलन केले जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्राधिकरणाचे सीईओ सतिशकुमार खडके यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बोर्‍हाडे, रणदिवे यांनी म्हटले आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर पुर्णपणे हटविण्यात यावा. 600 स्केवअर फुटापुढील क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा आणि वर्गवारी न करता सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा. महापालिका आणि प्राधिकरणाने  जाचक अटी न टाकता अनधिकृत बांधकामे नियमित करावीत. अर्ज केलेल्या घरांच्या क्षेत्रफळाची मागील थकबाकीचे कारण न सांगता फेरमोजणी करावी. भोगवटदार ही संकल्पना रद्द करुन नवीन मालकाचे नाव विना अटीवर लावावे. बँक, इतर आर्थिक संस्थामार्फत कर्ज मिळण्यासाठी महापालिका, प्राधिकरणाने ’ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावे. प्राधिकरणाचा 99 वर्षांचा भाडेकरार रद्द करुन जागेची मालकी सोसायटीला किंवा वैयक्तीक सुपूर्द करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.