अजित पवार यांचे आदेश
बारामती । बनावट सातबारा आणि बोगस व्यक्तिंच्या नावाने बारामती तालुक्यातील करंजे येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून 85 लाखांचे कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. एकाही दोषीला पाठिशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोमेश्वरनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये यापूर्वी दोनदा मोठे गैरव्यवहार झालेले आहेत. या गैरव्यवहाराची अजूनही चौकशी सुरू आहे. त्यावेळीही अजित पवार यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्हापरिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका दरम्यान ही कारवाई थंडावली होती. पुन्हा याच भागात एवढा मोठा घोटाळा झाला आहे. मात्र, आता कडक स्वरुपाची कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकर्यांच्या योगदानातून उभी राहिली असून राज्यातील सर्वात श्रीमंत बँक समजली जाते. या बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. यामुळेच या बँकेच्या गैरव्यवहारांकडे गांभिर्यांने पाहण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. दौंड तालुक्यातील असाच मोठा घोटाळा याच बँकेत झाला होता हेही महत्त्वाचे आहे. तसेच आंबेगाव तालुक्यातील घोटाळाही उघडकीस आला होता. त्याचमुळे बँकेवरचा लोकांचा विश्वास उडू नये म्हणून अजित पवार हे संतप्त झाले आहेत. 85 लाखांचा घोटाळा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत गुप्तता पाळली. या सर्व प्रकरणात बँकेचे अधिकारी व सोसायटीचे अधिकारी यांचे संगनमत असल्याचे दिसून येत आहे.