घोटाळे बाहेर काढल्यानेच हळदणकरांची हत्या!

0

पिंपरी-चिंचवड : माहिती अधिकार कार्यकर्ते सुहास हळदणकर यांनी नागरी समस्यांचा केलेला पाठपुरावा, बाहेर काढलेले घोटाळे आणि ऐन निवडणुकीत या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले राजकीय नेते या सुडातूनच हळदणकर यांची डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून भरचौकात हत्या केली गेल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आल्याचे सूत्राने सांगितले आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक सदगुरु कदम यांच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली असून, ते आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिस त्यांच्याकडून कसून माहिती घेत आहेत. स्त्रियांसाठी उभारण्यात आलेले सार्वजनिक स्वच्छतागृह व त्यात झालेला घोटाळा, नागरी समस्या सोडविण्यात स्थानिक नेतृत्वाला आलेले अपयश, आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या घोटाळ्यांचा हळदणकर यांनी केलेला पाठपुरावा व त्यामुळे अडचणीत आलेले काँग्रेसचे दोन नगरसेवक या संतापातूनच हळदणकर यांना ठार मारण्याचे नियोजन झाले होते व ते अखेर या आरोपींनी पूर्णत्वास नेले. हळदणकरांच्या हत्याकांडाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या सुरुच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडले तरी घातले सिमेंट ब्लॉक
रविवारी रात्री दहा वाजता सुहास हळदणकर हे त्यांच्या दुचाकीने घराकडे जात असताना, खराळवाडी चौकात दोन आरोपींनी त्यांना अडवले. त्यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्यांवरून आरोपींनी त्यांना दमदाटी केली व शिविगाळही केली. हा प्रकार सुरु असताना तिथे अन्य काही आरोपी आले. त्यापैकी एकाने हळदणकर यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक फेकून मारत त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली आहे. हळदणकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही अन्य काही आरोपींनी त्यांच्या डोक्यात शेजारी पडलेले सिमेंट ब्लॉक घातले, अशी माहितीही एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची ऋषिकेश काटे (वय 33) या प्रत्यक्षदर्शीने पिंपरी पोलिसांत फिर्याद दाखल केलेली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. आर. थुबल हे या घटनेचा तपास करत आहेत. त्यांनी 12 आरोपी अटक केले असून, त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.

हे आहेत आरोपी…
माजी नगरसेवक सदगुरु महादेव कदम (45), काल्या उर्फ संदीप तानाजी कलापुरे (39), प्रतुल रेवजी घाडगे (38), अभिजित बाळासाहेब कलापुरे (26), दत्तात्रय उर्फ फेट्या गुलाब कलापुरे (28), संतोष मगन उर्फ मुंड्या अरबेकर (43), प्रविण उर्फ झिंगर्‍या महादेव कदम (31), खंड्या उर्फ प्रविण पांडुरंग सावंत (24), संतोष उर्फ बाब्या चंद्रकांत कदम (27), अमर मोहम्मद पठाण (25) आणि सतीश महादेव कदम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी खराळवाडीतील रहिवासी आहेत. तर बाराव्या गणेश जाधव या आरोपीला नंतर अटक करण्यात आली होती.

काल्याची गेली होती नोकरी
काल्या उर्फ संदीप कलापुरे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बाल भवन येथे वॉचमन होता. परंतु, तो कामावर हजर राहात नाही. व्यवस्थित काम करत नाही, अशी तक्रार हळदणकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली होती. त्याची चौकशी होऊन मनपा प्रशासनाने काल्याला नोकरीहून काढून टाकले होते. त्याचा काल्याच्या मनात राग होता. तसेच, हळदणकर यांनी कैलास कदम याच्याविरोधात चौकात फलकही लावला होता. कैलास हा माजी नगरसेवक सदगुरु कदम याचा भाऊ आहे. त्याचाही राग कैलास व सदगुरु कदम यांच्या मनात होता. तसेच, निवडणुकीतही हळदणकर यांनी कदम यांच्याविरोधात काम केले होते. या सर्व रागातून तसेच माहिती अधिकार कायद्याचा वापर करून बाहेर काढलेल्या भानगडींच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व आरोपींनी हळदणकर यांचा खून केल्याची बाबही पुढे आली आहे.