वाहतुकीसाठी धोकादायक : लोखंडी अँगलची चोरी
आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथील घोडनदीवरील पुलाचे कठडे तुटल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तसेच संरक्षक कठड्यासाठी असणारे लोखंडी अँगल चोरीस गेले आहेत. वाहतुकीसाठी सुरक्षित असणारे कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ववत करावेत, अशी मगणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. लाखणगाव आणि चांडोह या दोन गावांना जोडणार्या घोडनदीवरील पुलाचे कठडे तुटलेले आहेत. अनेक दिवसांपासून कठडे तुटलेले असल्याने पुलावरून प्रवास करणार्या प्रवाशांना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
त्यामुळे पुलाला सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे. लोखंडी पाईप व अँगलच्या सहाय्याने पुलाला संरक्षण देण्यात आले होते. परंतु, दोन्ही बाजूने असणारे सुरक्षागार्ड तुटलेली आहेत. काही ठिकाणी पाईप निघून गेली असून काही ठिकाणी उभे केलेले अँगल वाकलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल त्वरीत दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.