ठाणे । घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवर अनधिकृत उभ्या असलेल्या वाहनांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व संबंधितांना तक्रार वजा निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष किरण पाटील यांच्या पुढाकाराने सदर निवेदन देण्यात आले आहे. ठाणे शहर पोलिस वाहतूक विभागाचे उपआयुक्त व ठाणे मनपा माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे उपआयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरूम, मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केली जातात.
हळूहळू फेरीवालेदेखील ठाण मांडू लागले आहेत. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावर अनेकदा वाहतूककोंडीही होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो असे असले, तरी महापालिका अथवा वाहतूक पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्यांना का सहन करायचा? सर्व्हिस रस्ता व्यावसायिक, शोरुम व मॉल यांच्यासाठी आहे का? येथील पार्किंगवर कारवाई न करण्याचे कारण काय? असे सवाल या निवेदनात उपस्थित करून सदर वाहनांवर कारवाई करावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.