घोडेगावात कुस्त्यांचा आखाडा

0

घोडेगाव । श्रावण महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी घोडेगावमध्ये भरणारी ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव यात्रा नुकतीच संपन्न झाली. हारतुरे, मिरवणूक, भजन स्पर्धा, कुस्त्यांचा जंगी आखाडा अशा भरगच्च कार्यक्रमात हा उत्सव साजरा करण्यात आला.

सोमवारी दुपारी पारंपरिक वाद्यांमध्ये हारतुरे मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचे मानकरी विजय घोडेकर यांनी देवाला हार घातला. सालाबादप्रमाणे सुरुवातीला हरिश्चंद्र मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी दिवसभर चावडीवर भजन स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत नामवंत 33 भजनी मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक वरसुबाई प्रासादिक भजनी मंडळ जावळेवाडी (ता. जुन्नर) व कमलजादेवी प्रासादिक भजनी मंडळ कोळवाडी (ता. आंबेगाव), द्वितीय क्रमांक बोरघर घोडेवाडीतील वनदेव प्रासादिक भजनी मंडळ, तृतीय क्रमांक अंबरनाथच्या शिवशंभो प्रासादिक भजन मंडळाने पटकाविला. या भजनी मंडळांना पंचायत समिती माजी सभापती कैलास काळे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. दुपारनंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. यामध्ये नामवंत 90 पहिलवानांनी सहभाग घेतला. कुस्त्यांच्या आखाड्यासाठी बक्षिस म्हणून गदा, ढाली, व रोख रक्कम देण्यात आली. तसेच हभप नारायण महाराज गोपाळे यांचे कार्ल्याचे कीर्तन झाले. दरम्यान 31 जुलै ते 6 ऑगस्ट या सप्ताह काळात हभप अभिजित महाराज गोंदीकर जालना यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला.