घोडेगाव शिवारात बेकायदा स्पिरीट तस्करीचा डाव उधळला ; दिड कोटींचा मुद्देमाल जप्त

0

युपी पंजाबमधील सहा आरोपी जाळ्यात ; अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कारवाई ; 11 जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ (गणेश वाघ)- दारू बनवण्यासाठी लागणार्‍या स्पिरीटाची बेकायदा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मालेगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाल्यावरून पथकाने रविवारी पहाटे मालेगाव ते मनमाड रोडलगत असलेल्या घोडेगाव शिवारातील हॉटेल साक्षीमागे छापा टाकून युपी-पंजाबमधील तस्करांच्या मुसक्या आवळत दोन टँकरसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून हॉटेल मालकासह अन्य पाच आरोपी पसार झाले आहेत. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर बनावट दारू बनवणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीत धुळे जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात आरोपींनी कुठे-कुठे बनावट दारूचा पुरवठा केला याबाबत उलगडा होणार आहे.

गुप्त माहितीनुसार सापळा रचून अटक
घोडेगाव शिवारातील हॉटेल साक्षीमागे बनावट दारू निर्मितीसाठी लागणार्‍या स्पिरीटाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास दोन टँकरमधून संशयीत आरोपी तथा टँकर चालक पुष्पेंदर कुमार विजय पाल (35, गालीबपूर, हातोली, जि.मुजफ्फरपूर, उत्तरप्रदेश), रणजीतसिंग सुभासिंग (35, तेलियावाला मोहल्ला, राजपूरा, पटीयाला, जि.पंजाब), गुरदीपकुमार तिलकराज (28, सिब्बोचक, मुकेरीया, जि.होशियारपूर, पंजाब), अजयकुमार सिंग राधेरामन (34, ददवा, लाहोटा, जयसिंगपूर, सुलतानपूर, उत्तरप्रदेश), राजेंद्रकुमार जीवनलाल डोंगरे (52, अर्जुननगर, रायसेन, मध्यप्रदेश) हे आपल्या दोन टँकरमधील डिस्टलरीला पुरवठा करणारे स्पिरीट द्रव पदार्थ मालकाच्या परवानगीशिवाय मालवाहू पीक वाहनातून आलेल्या सचिन कडू हिरे (21, निंबायती, मालेगाव, जि.नाशिक) यांना देत असताना पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच संशयीत आरोपी सतीश अहिरे, योगेश अहिरे, मालवाहू वाहनाचा चालक दादा अहिरे, मनोज शेवाळे (सर्व रा.निंबायती, ता.मालेगाव), राकेश जैन (धुळे) तसेच हॉटेल साक्षीचे मालक चेतन सरोदे (घोडेगाव, ता.मालेगाव) हे पसार झाले. पोलिसांनी युपी-पंजाबमधील सहा आरोपींच्या मुसक्या आवळून एक कोटी 48 लाख 38 हजार 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे धुळे येथील राकेश जैन याला या स्पिरीटचा पुरवठा करण्यात येणार होता तर त्याद्वारे तो बनावट दारूची निर्मिती करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपींविरुद्ध मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक ए.बी.क्षिरसागर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
मालेगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए.बी.क्षिरसागर, हवालदार ठोके, नाईक भिलावे, देवरे, माळी, दासरवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.