पुणे । पुणे कॅन्टोन्मेंट भागातील घोरपडी गाव आणि बाजार भागात ऐन उन्हाळ्यात मागील वीस दिवसांपासून लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे. मात्र, याकडे स्थानिक सदस्य आणि प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली. बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी गाव आणि घोरपडी बाजार भागात मागील काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. त्यातच मागील सुमारे वीस दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खोलवर असलेली जलवाहिनी फुटल्याने सकाळी मोठ्याप्रमाणावर पाणी गळती होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरविण्यात येत आहे. मात्र, पाण्याची गळती होत असल्याने या भागात पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
थानिक अधिकार्यांचे दुर्लक्ष
उन्हामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. त्यातच पाणी गळतीकडे वीस दिवसांपासून बोर्ड प्रशासन अधिकारी, तसेच स्थानिक अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही गळती अजूनही थांबू शकलेली नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि स्थानिक सदस्यांचा निषेध केला आहे. घोरपडी बाजार आणि घोरपडी गाव या भागांत जाणारा एकच रस्ता आहे. या रस्त्यांवर वारंवार पाणीगळती होत आहे. आतापर्यंत दोन वेळा या रस्त्याचे काम करण्यात येऊन या भागात होत असलेली पाण्याची गळती थांबविली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पाणी गळती सुरू झाल्यामुळे या रस्त्याचे तसेच पाणी गळतीच्या दुरूस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांत सुरू आहे.