घोराडेश्‍वर डोंगर झाला चकाचक

0

स्वच्छता मोहिमेत विविध सामाजिक संस्थांचा सहभाग

देहूरोड । विविध सामाजिक संघटनांनी घोराडेश्‍वर डोंगरावर स्वच्छता अभियान राबवून डोंगर व मंदिर परिसर चकाचक केला आहे. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. घोराडेश्‍वर मंदिराच्या संवर्धनासाठी निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाशिवरात्रीनिमित्त घोरावडेश्‍वर डोंगरावरील पुरातन महादेव मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. पायथ्याशी मोठी यात्राही भरली होती. भाविकांनी डोंगरावर कचरा निर्माण केला होता. अमरजाई मंदीर, डोंगरावरील दोन्ही महादेव मंदिरे, दरी सर्व पायवाटांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या व पिशव्यांचा कचरा साचला होता. दुसर्‍याचदिवशी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने मंदिराच्या पायथ्याचा पूर्ण परिसर साफ केला. तर, काही स्वयंसेवी संस्थांनी पुढचे दोन-तीन दिवस पायवाटा मंदीराजवळ प्लास्टिक कचरा संकलित केला.

जमा केलेल्या कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया
या डोंगरावराचा विस्तार व कचर्‍याची व्याप्ती विचारात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभागाने पिंपरी चिंचवड, देहुरोड, तळेगाव परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सहभागातून रविवारी व्यापक स्वरुपात घोरावडेश्‍वर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तीन ट्रक प्लॅस्टीक कचरा डोंगरावर जमा करून तो डोक्यावरून पायथ्याशी आणण्यात आला. पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब व फाल्कन ट्रेकर्स चिंचवडच्या सदस्यांनी दोरांच्या सहाय्याने मंदिरासमोरील दरीत उतरून 60 पेक्षा जास्त पोती प्लास्टिक कचरा बाहेर काढला. तर, अन्य संस्थांनी संपूर्ण डोंगर परिसर स्वच्छ केला. अद्यापही डोंगरावरील आजूबाजूला थोडाफार प्लास्टिक कचरा असून आगामी काळात तोही जमा करून पुर्नप्रक्रियेसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आगामी काळात प्लास्टीक पिशव्या व बाटल्यांचा वापर होणारच नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या संस्था
वृक्षवल्ली परिवार, बजरंगदल-मावळ, पोलिस नागरिक मित्र, साईनाथ मित्र मंडळ, चिंचवड, चला मारु या फेरफटका- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्युटन इंटरनॅशनल बाणेर, सायकल मित्र, कै. दिपक धोत्रे ट्रस्ट, पिंपरी, आवर्तन ग्रुप, ओम निसर्गमित्र, देहुरोड भाजप व व्यापारी संघ, इंडो सायकल क्लबचे सदस्य यात सहभागी झाले होते. नगरसेवक रघुवीर शेलार, कैलास पानसरे, नरेश गुप्ता, जयंत जाधव याप्रसंगी उपस्थित होते.