पुणे । अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील तब्बल 2 हजार दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. केवळ पुण्यातच नव्हे, तर यंदा सांगलीतील दत्तमंदिरासह राजस्थान, गुजरात यांसारखी राज्ये व अमेरिकेतील विविध शहरांतून दत्तभक्तांनी ई-सत्संगाच्या माध्यमातून या उपक्रमात सहभाग घेतला होता.
दत्तजयंतीच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदौर), नगरसेवक हेमंत रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, बाळासाहेब गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा 120 वे वर्ष असून प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे 121 वे जयंती वर्ष आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक रमेश रावेतकर व सहकारी यांनी सादर केलेल्या दत्तगीतांनी झाली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या उच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तर घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.