घोरावडेश्वर प्रकल्पाला ‘ट्री मॅन’चे विष्णू लांबा यांची भेट

0

देहूरोड :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या देहुरोडजवळील हरीत घोरावडेश्वर प्रकल्पाला पर्यावरण रक्षणाच्या कार्यात ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या विष्णू लांबा यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्वयंसेवकांसोबत श्रमदान करून वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शनही केले. सावरकर मंडळाच्या वतीने मागील आठ वर्षांपासून हरित घोरावडेश्वर प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजअखेर आठ हजार झाडांची लागवड करून कठीण परिस्थितीत मंडळाने पाच हजार झाडे जगविली आहेत.

यांची होती श्रमदानासाठी उपस्थिती
सावरकर मंडळाच्या वतीने देहुरोड येथे स्थानिक प्रजातीच्या दहा हजार रोपांची नर्सरी तयार केली आहे. केली असून ते विविध संस्थांना मागणी नुसार मोफत दिली जाणार आहेत. याप्रसंगी सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, निसर्ग मित्र विजय सातपुते, रोहिदास जाधव, सुनील गुरव, प्रभाकर कारंडे प्रशांत बेंद्रे, दीपक पंडित, हेमंत थोरात, रवी मनकर, मनेश म्हस्के, राजेश देशमुख यांच्यासह ओम निसर्ग मित्र चिंचवड, चला मारु फेरफटका, पीसीसीएफ आणि इतर संस्थांचे कार्यकर्ते सहपरिवार श्रमदानासाठी उपस्थित होते.

विष्णू लांबा गेली 24 वर्षे वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहेत. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी 33 लाख वृक्षांची लागवड केली आहे. देशात हरित क्रांती रुजविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून देशाचा ट्री मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. या कामात त्यांनी राजस्थानमधील उजाड होत चाललेल्या चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांनाही वृक्ष लागवडीच्या कार्यात सहभागी करून घेतले आहे. जयपूरमधील एका कार्यक्रमात त्यांच्याशी सावरकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट झाली. तेंव्हापासून हरित घोरावडेश्वर प्रकल्पांची माहिती असल्याने त्यांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली.