पिंपरी-चिंचवड : येथे प्रथमच इंडो सायकलिस्ट क्लबतर्फे (आयसीसी) रविवारी (दि. 26) ‘घोरावडेश्वर बाईक अॅन्ड हाईक्स’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महिला-पुरूष यांच्या सोबतच बच्चेकंपनी मिळून 400 नागरिकांनी सायकलींग व ट्रेकिंगचा आनंद घेतला. तसेच घोरावडेश्वर टेकडीवर स्वच्छता मोहीमही या निमित्ताने राबविण्यात आली. सुट्टीचा दिवस सत्कारणी लागावा व त्याचा आपल्या निसर्गाला फायदा व्हावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सफरीला सायकल रॅलीद्वारे सकाळी पावणेसहा वाजता डॉ. सुहास माटे व आयसीसी कोर टीमने झेंडा दाखवून निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सुरुवात केली. ही 11 किलोमीटरची सायकलींग गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर संपली. त्यानंतर 3 किलोमीटरच्या घोरावडेश्वरची चढाई सर्वांतर्फे करण्यात आली.
आयसीसीतर्फे विविध उपक्रम
या उपक्रमासाठी बीव्हीजी इंडियातर्फ रुग्णवाहिका, धनश्री हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय सुविधा तर पेटल टाऊनतर्फे सायकल दुरुस्तीसाठी सहकार्य करण्यात आले. यामध्ये 150 महिला, 50 लहान मुले व 200 पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर जगताप यांनीही भेट दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. यापूर्वीही सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आयसीसीतर्फे राबवले गेले आहेत.
आयोजकांनी दिला सामाजिक संदेश
या उपक्रमाचा मूळ उद्देश हा की, लोकांनी छोट्या-छोट्या कामांसाठी बाईक किंवा कारचा वापर करू नये. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्येही टेकडीवर मोठ-मोठ्या कारमध्ये जाणे व तिथे फेरफटका मागणे ही संस्कृती वाढत चालली आहे. त्याऐवजी टेकडीवर सायकलने जा, मग फेरफेटका मारा, असा संदेश या उपक्रमातून आयोजकांनी दिला आहे. सायकलमुळे इंधन वाचते, आरोग्य उत्तम राहते तसेच प्रदूषणही होत नाही. त्यामुळे सर्वांनी तिचा जास्तीत-जास्त वापर करावा, यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत; ज्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.