400 पेक्षा अधिक निसर्गप्रेमींनी नोंदविला सहभाग
पिंपरी-चिंचवड : वनीकरणाची गरज आणि त्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावे, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागातर्फे घोरावडेश्वर येथे वनमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 400 पेक्षा अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. सावरकर मंडळामार्फत मागील दहा वर्षांपासून निसर्गमित्र विभाग विविध भागात कार्यरत आहे. विभागाने आजवर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण महोत्सव, पर्यावरण निबंध स्पर्धा, नदी स्वच्छता, कौटुंबिक किल्ले व निसर्ग सहली आदी उपक्रम नियमित राबविले आहेत.
वनमेळाव्याचे सातवे वर्ष
हरीत घोरावडेश्वर प्रकल्पाअंतर्गत घोरावडेश्वर डोंगरावर हजारो झाडांची लागवड करण्यात आली असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पाच हजारांपेक्षा अधिक झाडे जगविण्यात आली आहेत. मंडळाच्या विविध उपक्रमात नियमितपणे सहभागी होणार्या निसर्ग मित्रांचा मेळावा दरवर्षी प्रत्यक्ष डोंगरावर आयोजित केला जातो. वनमेळाव्याचे यंदाचे सातवे वर्ष होते. या मेळाव्यासाठी वृक्षवल्ली परिवार, पवनामैय्या जलमैत्री अभियान, चला मारू या फेरफटका, निसर्गमित्र तळेगाव, स्पाईनरोड वृक्षमित्र, सायकल मित्र, निसर्ग राजा, मैत्र जिवांचे, ओरिएन्टल मार्व्हल सोसायटी, पीसीसीएफ इत्यादी पर्यावरणप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.