घोरावडेश्‍वर खूनप्रकरणातील आरोपी मोकाटच

0

देहूरोड : घोरावडेश्‍वर डोंगरावर तरूणीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या घटनेला चार दिवस उलटूनही पोलिस तपासात फारशी प्रगती होऊ शकली नाही. याप्रकरणी पथक तपासावर गेले असून या तपासात गोपनियता महत्त्वाची असल्यामुळे काही बाबी आत्ताच उघड करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घोरावडेश्‍वर डोंगरावरील एका झाडाखाली कांचन मधुकर शिंदे या तरुणीचा मृतदेह गुरुवारी (दि. 20) आढळला होता.

गूढ दिवसागणिक वाढत चालले
या मृतदेहाची सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, एका रात्रीतच पोलिसांनी शोध घेऊन तिची ओळख पटविण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर चार दिवस उलटूनही पोलिसांचा तपास फारसा पुढे सरकल्याचे दिसत नाही. घटना उघडकिस येण्यापुर्वी तीन दिवसापुर्वी (दि. 17) कांचन हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते. यावरुन प्रत्यक्ष खूनाच्या घटनेला आता तब्बल सात दिवस झाले आहेत. पण पोलिसांपुढे आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान कायम आहे. या प्रकरणात संशयाची सुई कुणावर आहे, याबाबत पोलिसांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ दिवसागणिक वाढत चालले आहे. कांचनच्या मारेकर्‍याचा शोध लावण्यात तरी पोलिसांना यश येईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

अनेक प्रकरणे अधांतरीतच
यापुर्वी तळवडे येथे आयटी पार्क परिसरात संगणक अभियंता अंतरा दास हिचा असाच संशयास्पद खून झाला होता. त्या प्रकरणात तिच्या मित्राला संशयावरुन पोलीसांनी अटक केली. मात्र, त्याच्याविरुध्द ठोस पुरावे सादर करण्यास पोलिस अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. अशाच प्रकारे लोणावळा येथे एका महाविद्यालयीन तरूण-तरुणीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणालाही महिना होत आला तरी पोलिसांना आरोपीचा मागमूसही लागू शकला नाही. त्यामुळे आता कांचन हिच्या खूनप्रकरणाचा तरी छडा लागेल का, असा सवाल विचारला जात आहे.