पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा लावलेल्या आगीमध्ये झाले मोठे नुकसान
स्वा. सावरकर मंडळाने लावलेली झाडे जळाली
देहूरोड : निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने परिश्रमाने देहूरोड जवळील घोरावडेश्वर डोंगरावर उभारलेल्या वनराईतील काही झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अज्ञात समाजकंटकांनी हेतुपुरस्सर चार ते पाच वेळा लावलेल्या आगीमध्ये अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. त्याबरोबरच पाईपलाईन आणि पाण्याची टाकी देखील जळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने या डोंगरावर मोठी वनराई निर्माण केली होती. मंडळाच्या सदस्यांनी आले अनेक झाडे लावून त्यांची निगराणी करीत ही वनराई निर्माण केली होती. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी येथे येऊ लागले होते. तसेच डोंगरावरील या झाडांमुळे येथे फिरायला, व्यायामासाठी येणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली होती. मात्र अचानक गेल्या काही दिवसांपासून या डोंगरावर आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
हे देखील वाचा
काही मोठी झाडे बचावली
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने देहूरोड जवळील घोरावडेश्वर डोंगरावर गेल्या दहा वर्षांत हजारो झाडे लावली आहेत. उन्हाळ्यात पाणी देऊन ही झाडे प्रयत्न पुर्वक जगवली आहेत. दोन वेळा निसर्ग मित्र आणि वनविभाचे कर्मचारी सुनील भुजबळ यांनी ही आग विझवली. त्यामुळे काही प्रमाणात मोठी झाडे आगीतून वाचली आहेत. निसर्ग मित्रांनी नेहमीप्रमाणे झाडांभोवतीचे गवत अगोदरच कापलेले असल्यामुळे काही झाडांना फक्त झळ लागली. या झाडांना पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक संस्था सहकार्य करीत आहे. या परिसरात विघातक काम करताना कोणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व निसर्गप्रेमींनी केली असल्याची माहिती भास्कर रिकामे यांनी दिली.
हजारो झाडे लावली
यावेळी भास्कर रिकामे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने देहूरोड जवळील घोरावडेश्वर डोंगरावर गेल्या दहा वर्षांत हजारो झाडे लावली आहेत. उन्हाळ्यामध्ये देखील पाणी घालून झाडे जगविली आहेत. त्यामुळे डोंगराचा परिसर हिरवाईने नटून गेला होता. पंरतु, गेल्या 15 दिवसांत अज्ञात समाजकंटकांनी हेतुपुरस्सर लावलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. तसेच पाईपलाईन आणि पाण्याची टाकी देखील जळाली आहे. अशा समजाकंटकावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. सारखे आग लावण्याच्या प्रकारामागे काय हेतू असेल ते कळत नाही. झाडांची सुंदर वनराई जळून नष्ट झाली आहे.