देहूरोड : श्रावणातला पहिला दिवस शिवभक्तांसाठी पर्वणीच ठरला. आज पहाटेपासूनच घोरावडेश्वर लेणीत शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विकासनगर रस्त्यावरील शंकर मंदिरातही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शेलारवाडी येथील घोरावडेश्वर डोंगरावरील लेणीत शिवलिंगाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविक आले होते.
घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने डोंगरावर जाण्यासाठी पायर्या करण्यात आल्या असल्या तरी काही ठिकाणी अवघड चढण, निसरडा रस्ता, चिंचोळी वाट आदी समस्यांचा भाविकांना सामना करावा लागतो. डोंगराच्या पायथ्याला वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलातून वाट काढत जाताना भाविकांचे हाल झाले. विशेषतः सहकुटूंब आलेल्या भाविकांना लहान मुले घेऊन या रस्त्याने जाताना अनेक अडचणी येत होत्या. देहूरोड-विकासनगर रस्त्यावरील शंकर मंदिरातही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. त्यात उत्तर भारतीय महिला व श्रद्धाळूंचा सहभाग लक्षणीय होता.