चंगळवादी वृत्तीमुळे पर्यावरण धोक्यात : अच्युत गोडबोले

0

पुणे । सध्याच्या युगात जाहिरातीचा मोठ्या प्रमाणात मारा होत आहे आणि त्याला प्रतिसाद देत आपण ज्या गोष्टींची गरज नाही किंवा गरज पूर्ण झालेली असतानाही केवळ साठा करण्याच्या दृष्टीने वस्तू जमवून ठेवत आहोत. या चंगळवादी वृत्तीचा पर्यावरणावर परिणाम होत असून पर्यावरण धोक्यात आले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.बाराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम महाविद्यालय आयोजित ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे उद्घाटन गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मारुती चितमपल्ली, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.

निसर्गतत्त्वाचा स्वीकार करणे गरजेचे
निसर्ग आपल्याला द्यायला शिकवतो. पण आपण मात्र निसर्गाला ओरबडत चाललो आहोत. उध्वस्त करणाची प्रक्रिया जोर धरत आहे, त्याचा गंभीर परिणाम निसर्गावर होत आहे. आपल्या गरजा कमी करणे आणि गरजेपुरतेच निसर्गाकडून घेणे, या निसर्गतत्त्वाचा स्वीकार करायला हवा, असे मिलींद जोशी यांनी सांगितले. वीरेंद्र चित्राव आणि दिलीप शेठ यांनीही मनोगत व्यक्त केले. स. प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला ’ग्रीन कॅम्पस, क्लीन कॅम्पस’ हा लघुपट यावेळी दाखविण्यात आला. विविध स्पर्धांच्या परितोषिकांचे वितरण करण्यात आले. उद्देश पवार यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.

मानसिकतेवरही परीणाम
चंगळवादामुळे ओरबडण्याची वृत्ती वाढते आहे. अमेरिकेत जगातील केवळ पाच टक्के लोकसंख्या राहते. पण एकूण नैसर्गिक स्रोतांपैकी 25 टक्के वापर हा त्यांच्याकडून केला जातो. जिथे ही विषमता आहे, तिथे माणसे जास्त निराश आहेत, असेही निरीक्षण आहे. चंगळवादाचा परीणाम या पद्धतीने मानसिकतेवरही होत आहे. हे थांबवायचे असेल तर तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा तुम्ही काय आहात, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे गोडबोले यांनी पुढे सांगितले.