चंदनचोरीबाबत ठेकेदारास नोटिस

0

कात्रज । येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील दोन चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकांचा हलगर्जीपणा झाल्याचे आणि त्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. या उद्यानाला सुरक्षा रक्षक पुरविणार्‍या ठेकेदारास कारणे दाखवा नोटिस बजावल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा विभाग प्रभारी प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.

कात्रज उद्यानातील चंदनचोरीप्रकरणी चोरी गेलेल्या चंदनाच्या बाजार भावाप्रमाणे दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणाही करण्यात आल्याचे दौंडकर यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटर अंतरावर ज्या ठिकाणी साप ठेवले आहेत, त्या इमारतीमागे चंदनाची वाढ झालेली मोठी तीन झाडे होती. त्यातील दोन झाडे कापून त्यांचा बुंधा काढून नेण्यात आला. ज्या प्रकारे ही झाडे तोडण्यात आली आहेत त्यावरून इलेक्ट्रिक सॉ कटर वापरून ही झाडे तोडल्याचे दिसून येत आहे.

पूर्वीही उद्यानात घुबड तसेच मोरांची चोरी
या संपूर्ण उद्यान परिसराच्या सुरक्षेसाठी 48 रक्षक आहेत. त्यात 8 महापालिकेचे आहेत. तर उर्वरित 40 ठेकेदारांच्या माध्यमातून भरण्यात आले आहेत. त्यातील 25 रक्षक कमी करण्यात आले आहेत. या पूर्वीही उद्यानात घुबड तसेच मोरांची चोरी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती. मात्र, आता सुरक्षाच कमी केल्याने त्या दिवशी अवघे 9 कर्मचारी कामावर होते. त्यातही 2 सेवक हे महापालिकेचे होते. तर ही उद्यानाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींची पाहणी केली असता, रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या वेळेत हा प्रकार घडला आहे. त्यावेळी सुरक्षा रक्षकांची शिफ्ट बदली होते. त्यामुळे हे सर्व सुरक्षा रक्षक उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच असतात. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन ठेकेदारास नोटिस बजाविण्यात आली आहे.