चंदा कोचरवर ईडीची कारवाई; ७८ कोटींची संपत्ती जप्त !

0

मुंबई : व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिले होते. याप्रकरणी आता आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली आहे. 78 कोटींची ही मालमत्ता आहे. चंदा कोचर यांच्याविरोधात 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या 3,250 कोटींच्या कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेची कर्जदार कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजद्वारे कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूकिबाबत घोटाळ्याच्या आरोपांनंतर ऑक्टोबर 2018 मध्ये चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बँकेकडून चंदा कोचर यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत चंदा कोचर यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. 2018 मध्ये जेव्हा चंदा कोचरने राजीनामा दिला होता, तेव्हा बँकेने तो स्वीकार केला होता. त्या राजीनाम्याला वैध मानले जावे, अशी मागणी चंदा कोचर यांनी न्यायालयाकडे केली आहे.