चंदा कोचर यांचा पगार दिवसाला 2 लाख!

0

मुंबई । आयसीआयसीआय बँक या देशातील दुसर्‍या मोठया बँकेच्या प्रमुख व फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल 64 टक्क्यांनी वाढले आहे. त्यांना दिवसाला 2.18 लाख पगार व मूळ वेतनात 15 टक्के वाढ झाली आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचार्‍यांचे वेतन 2016-17 मध्ये 12 टक्क्यांनी वाढले आहे.

कामगिरी लाभांश 2.20 कोटी
आयसीआयसीआय या खासगी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांना गेल्या वर्षांत एकूण 7.85 कोटी रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षांत ही रक्कम 4.79 कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांना 2.67 कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. कामगिरी लाभांश म्हणून त्यांना 2.20 कोटी रुपये मिळाले आहेत. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणार्‍या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

2015-16 मध्ये कामगिरी लाभांश नव्हता
आधीचे वित्त वर्ष 2015-16 मध्ये बँकेला फारसे आर्थिक यश न मिळाल्याने कोचर यांना त्या वर्षांत कामगिरी लाभांश मिळाला नव्हता. 2015-16 च्या शेवटच्या तिमाहीत बँकेने नफ्यातील 87 टक्के घसरण नोंदविली होती. कोचर यांचे मूळ वेतन गेल्या आर्थिक वर्षांत 15 टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचार्‍यांच्या वेतनात 12 टक्के वाढ झाली आहे. हा लाभ मिळणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या 82,841 आहे. बँकेच्या कार्यकारी संचालकपदावरील व्यक्तींना गेल्या आर्थिक वर्षांत 7.56 कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. कोचर यांच्यानंतर एन. एस. कन्नन यांच्या वेतनात 62 टक्के वाढ झाली आहे.