चंदा कोचर यांना सीईओपदावरून हटवा!

0

नवी दिल्ली : व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामुळे गोत्यात आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणीतील आणखी वाढ झाली आहे. कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदावर ठेवण्यात त्यांच्याच काही सहकार्‍यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना या पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी केली केली आहे. त्यामुळे कोचर यांची सीईओपदावरून केव्हाही हकालपट्टी होण्याची किंवा त्या स्वत:हून पदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

चंदा कोचर यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ 31 मार्च 2019 रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयसीआयसीआय बँकेतील घोटाळा बाहेर आल्याने कोचर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या बोर्डावर एकूण 9 स्वतंत्र संचालक आहेत. त्यात चेअरमन आणि एलआयसीच्या प्रमुखांचा समावेश आहे. या संचालकांमध्ये फूट पडली असून काही संचालकांनी कोचर यांना सीईओपदावर ठेवण्यास विरोध दर्शविला आहे. दोन आठवड्यापूर्वीच कोचर यांच्यावर बँकेच्या बोर्डाने विश्‍वास व्यक्त केला होता. मात्र कोचर यांनी निष्पक्ष चौकशी होईपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा म्हणून बोर्डाच्या काही सदस्यांनी दबाव वाढविल्याचा दावा ब्लूमबर्गने केला आहे. दरम्यान, बँकेने या दाव्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3 हजार 250 कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉन ग्रुपकडून कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर कंपनीला अर्थपुरवठा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांची प्राथमिक चौकशी केलेली आहे. आवश्यकतेनुसार दीपक कोचर यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.