जळगाव । शनिपेठेत चंदा मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मोबाईल चोरणार्यास नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्याकडून चोरीला गेलेले दोन्ही मोबाईल मिळून आले असून त्यास शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. यातच त्याच्याकडून आणखी काही मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अंगझडतीत सापडले दोन मोबाईल
शनिपेठेतील सोमवारी दुपारी अल्पवयीन युवक त्याच्या दोन साथीदारांसोबत चंदा मागत फिरत होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास नॅशनल हॉलजवळील रहिवासी युनूस शेख यांच्या घरी जावून चंदा मागितला. परंतू, युनूस शेख व कुटूंबिय दुपारी झोपलेले असल्याचे पाहून चंदा मागणार्या अल्पवयीन भामट्याने घरात घुसून हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. यानंतर भामट्याने आपला मोर्चा पुढे सरकवत त्यांनी जवळच राहणारे इरफान सैय्यद यांचे घर गाठले. त्या ठिकाणी लहान मुलगा पाहून त्यास पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून पिण्यासाठी पाणी दे असे सांगितल्यावर चिमुकला पाणी घेण्यासाठी घराच्या आत गेल्यावर ही संधी साधत अल्पवयीन भामट्याने घरात घुसून टिव्हीवर इरफान यांचे भाऊ इमरान सैय्यद यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेवून पोबारा केला. यातच युनूस शेख यांना जाग आल्यानंतर त्यांनी मोबाईल शोधल्यावर दिसून आला नाही. त्यातच इरफान यांनाही घरातील मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच गल्लीत चंदा मागणार्या भामट्यानेच चोरी केल्याचे कळताच इरफान सैय्यद यांच्यासह शोएब शेख, आसिफ खान, मोहसिन खान, वकार शेख, आरिफ शेख यांनी अल्वयीन भामट्यासह त्यांच्या साथीदारांचा पाठलाग करत बळीरामपेठेत त्यांना पकडले. यावेळी अल्पवयीन भामटा त्यांच्या हाती लागला तर अन्य दोघे फरार होण्यास यशस्वी झाली. परंतू अल्पवयीन भामट्यास चांगलाच चोप दिल्यानंतर शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविल्या असता त्याने चोरलेले दोन्ही मोबाईल पोलिसांना काढून दिले. यातच त्याने अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या चोर्या केल्याचेही नागरिकांचे म्हणणे होते.