उस्मानाबाद : चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मी आधीपासूनच मी काहीच बोलले नाही. आता जर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत दिलगिरी व्यक्त केली असेल तर माझी मीडियाला व सगळ्यांना विनंती आहे की आता या वादावर पडदा टाकायला हवा, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाबद्दल सुळेंनी केलेल्या विधानावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांचा तोल सुटल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.
टिकेची उठली होती झोड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना घरी जा, स्वयंपाक करा, असा मागास सल्ला देणार्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्यांना नोटीस बजावली होती व यानंतर पाटलांनी खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ’आयुष्याची 45 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणार्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून 5 महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही,’ असे पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.