पिंपरी : रावसाहेब दानवेंच्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. दानवे हे शेतकरी कुटुंबातून आल्याने त्यांना शेतीची उत्तम जाणीव आहे, असे सांगत भाजप नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दानवे यांची पाठराखण केली आहे. दानवेंवर शेतकरी रागावलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयाचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्भवलेल्या वादावर भाष्य केले. मी माध्यमांना दोष देणार नाही. पण रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. मात्र दानवेंच्या विधानाने शेतकरी नाराज नसून दानवे हे शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत, असेही पाटील यांनी आवर्जून सांगितले. संरपंच ते खासदार असा दानवेंचा प्रवास असून शेतकर्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे आणि ते शेतकर्यांसाठी भांडणारे नेते आहेत. त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज होणार नाहीत, असे पाटील यांनी नमूद केले. पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विरोधकांनी त्यांचे काम केले असून रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत त्यांनी दानवेंवर तूर्तास कारवाई होणार नाही असे संकेतच दिले आहेत.
दरम्यान, याचवेळी शेतकरी कर्जमाफीवरही चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी रान उठवले आहे. पण शेतकर्यांना सरकारवर विश्वास असल्याने विरोधकांना प्रतिसाद मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकर्यांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. यानिमित्त आम्ही संवाद यात्रेचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. पण त्याआधी शेतकरी सक्षम होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले. सरकारमधील प्रत्येक घटकपक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून आम्ही त्यांना गप्प बसा असे सांगणार नाही असे पाटील यांनी म्हटले आहे.