चंद्रपूर । चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान आता वन्यजीवांच्या मुळावर उठले आहे. आज सकाळी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर नाल्यातील अपु-या पाणीसाठ्यात एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अति उष्णतेने अस्वस्थ झालेल्या वन्यजीवाचा हा मृत्यू असल्याची बाब वनाधिका-यांनी बोलून दाखविली आहे.
विशेष म्हणजे 24 तास आधी या परिसरात ही वाघीण अस्वस्थ स्थितीत फिरत असताना ग्रामस्थांनी बघितली होती. आज तिचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी नियमित गस्तीदरम्यान वन पथकाला ही बाब नजरेस पडली. तातडीने वरिष्ठांना या घटनेची माहिती देण्यात आली. हे घटनास्थळ कक्ष क्र 436 आणि 458 यांच्या मधोमध एका नाल्यात आहे.
या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून घातपाताची कुठलीही शक्यता वनाधिका-यांनी फेटाळून लावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले 3 दिवस सतत चढते तापमान आहे 47 आणि 47.2 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली असताना या उन्हाच्या झळा वन्यजीवानाही घातक ठरू लागल्याचे चित्र आहे.
वाघिणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चिचपल्ली येथे आणण्यात आला आहे. मृत्यूचे खरे कारण या अहवालात स्पष्ट होणार आहे. गेले काही दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल एकीकडे वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे मृत्यू अथवा वाघांचे मृत्यू यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.