चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान

0

मुंबई : चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच १९ एप्रिलला मतदान होत असून यातील २०१ जागांसाठी एक हजार २८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या महापालिकांतील एकूण सात लाख ९२ हजार ७२० मतदार मतदानासाठी पात्र असून त्यासाठी एक हजार १९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी दिली. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरूवात होईल. ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० ऐवजी ६.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी रॅम्प, व्हीलचेअरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ऊन्हाचा तडाखा लक्षात घेऊन प्रथमोपचाराबरोबरच रूग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आवश्यक तेवढ्या मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एक हजार ३२२ कंट्रोल युनिटचा तर चार हजार २८४ बॅलेट युनिटचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणी येत्या २१ एप्रिलला मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर तेथील आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया म्हणाले.

महानगरपालिका   जागा    उमेदवार     मतदार संख्या    मतदान केंद्रे    कर्मचारी
चंद्रपूर               66        460         3,02,057          367           2,008
लातूर               70         407         2,77,775          371           2,050
परभणी             65         418          2,12,888         281          1,681
एकूण              201     1,285      7,92,720       1,019         5,739