पुणे : येरवडा शांतीनगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांची कामे येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्यात येतील व पुढील सहा महिन्यांच्या आत ही कामे पूर्ण होतील, त्याचबरोबर चंद्रमानगर येथील पुर्नवसनाचा प्रश्न पंधरा दिवसांत मार्गी लावण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
बीएसयुपी योजनेर्तंगत प्रभाग क्र. 2मधील शांतीनगर व चंद्रमानगर येथील घरांची कामे अर्धवट असल्याचे आणि योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे या प्रभागातील नगरसेवक सुनील टिंगरे यांनी गेल्या आठवड्यातील पालिकेच्या मुख्यसभेत आवाज उठविला होता. घरांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले होते. त्यावर आयुक्तांनी पुढील आठवड्यात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्तांनी ही बैठक घेतली. यावेळी शीतल सांवत, उपायुक्त विजय दहिभाते, अतिरिक्त नगराभियंता श्रीनिवास बोनाला आदी अधिकारी उपस्थित होते. या चर्चेनंतर आयुक्तांनी 15 दिवसांच्या आत शांतीनगर येथील घरांची कामे सुरू होतील आणि ही कामे पुढील महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येतील असे स्पष्ट केले. या योजनेत गैरकारभार करणार्यांची चौकशी करून दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
चंद्रमानगर येथील बीएसयुपी योजनेसंदर्भात येथील सर्व नगरसेवक, संबंधित अधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली जाईल, जे रहिवाशी या योजनेत सहभागी झालेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.