पॅरीस : काव्यामध्ये चंद्र हृदयद्रावक असतो आणि प्रेमाच्या ओलावा त्याच्यात असतो. साहित्यिकांचे चंद्राचे वर्णन खरे ठरले असून शास्त्रज्ञांच्या कोरड्या चंद्रप्रतिमेला मात्र आता तडा गेला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे प्रचंड साठे सापडले असून चांद्रवीरांची तहान भागविण्यासही ते उपयोगी ठरणार आहेत.
अमेरिकेतल्या ब्राउन विद्यापीठातील शुआई ली चंद्रावरील पाण्याबाबतच्या संशोधनाबद्ल माहिती दिली. सॅटेलाईट डेटाच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. आतापर्यंत चंद्र हा कोरडा आहे. त्यावर दगड, माती आहे, असे मानले जात होते. अपोल चांद्रयानाने आणलेल्या या दगडांनीच चंद्राच्या पृष्ठभागाखालील पाण्याचा पुरावा दिला आहे. ज्वालामुखीच्या अवक्षेपांखाली अनपेक्षितपणे पाण्याचे मोठे साठे सापडले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागाखालील मॅग्माच्या स्फोटांनी काचेच्या गारांचा थर तयार झाला. त्याने पाण्याच्या अस्तित्वाची संभाव्यता वाढली, असे वैज्ञानिकांनी सांगितले.
नेचर जिओ सायन्स जर्नलमध्ये संशोधन लेख लिहिलेले राल्फ मिलिकन म्हणतात अपोलोने आणलेले नमुने चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागाचे प्रातिनिधीक असतील तर चंद्राला कोरडा समजता येणार नाही. सोविएत चांद्र मोहिम तसेच अपोलो मोहिमेने न गोळा केलेले नमुने वैज्ञानिक अन्य स्त्रोतांतून मिळवत आहेत. तेही पाण्याच्या साठ्यांबद्दल खूप काही माहिती देतात असे मिलीकन म्हणाले.