हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यांतर आता नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आणखी एक धक्का दिला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांवर आंध्र प्रदेशमध्ये धाडी टाकण्यास बंदी घातली होती. ती बंदी नव्याने आलेल्या सरकारने हटविली आहे. वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रेड्डी यांच्या निर्णयामुळे राज्यतील कोणीही अपराधी वाचू शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकार या संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संस्थांना एका करारानुसार राज्यांची परवानगी न घेता धाडी टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. हा करारच तत्कालीन नायडू सरकारने मागे घेतला होता. यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये 175 पैकी 151 जागा जिंकल्या होत्या.