महाआघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे प्रयत्न
नवी दिल्ली : आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलेले तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. संसदेत या दोन्ही नेत्यांचे बराच वेळ गुफ्तगू झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपविरोधी महाआघाडीची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपविरोधी पक्षांच्या हालचाली
सद्या राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न काँग्रेससह विरोधी पक्षांचे सुरू आहेत. यात काँग्रेस पक्षासह ममता बॅनर्जी, शरद पवार विविध पक्षांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांचे 25 वर्षाहून अधिक वर्षाचे जुने संबंध आहेत. त्यामुळे पवारांनी नायडूंशी महाआघाडीबाबत चर्चा केली असण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला 20 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पवार यांच्या घरीही झालेल्या बैठकीत बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. त्यामुळे महाआघाडी स्थापन करण्यासाठी भाजपविरोधी पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.
आघाडीसाठी पवारांचा पुढाकार
शरद पवार यांनी यात आघाडी घेतली आहे. पवार गेली अनेक वर्षे दिल्लीच्या राजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे विविध राज्यातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा आता महाआघाडी स्थापन करताना विविध नेत्यांची संवाद साधण्यात पवारांनी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनीही पवार यांना महाआघाडीचे नेतृत्त्व करावे अशी विनंती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-चंद्राबाबू यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चेने भाजपसह विरोधी पक्षांनी तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.