‘चंबल’च्या कर्मचार्‍यांना दोन दिवसात न्याय देणार

0

कार्मिक अधिकारी तुषाबा शिंदेचे आश्‍वासन ; डॉ.नि.तू.पाटील यांचा पुढाकार

भुसावळ- जंक्शन स्थानकावरील चंबल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये काम करणार्‍या कामगारांची पिळवणूक करून त्यांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित ठेवण्यात आले होते. या संदर्भात डीआरएम, रेल्वे मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाकडे तक्रारी करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छतेचे काम करणार्‍या कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी डॉ.नि.तू.पाटील यांनी पुढाकार घेतला होता. रेल्वेच्या कार्मिक विभागाचे अधिकारी तुषाबा शिंदे यांची भेट घेवून त्यांनी समस्या मांडल्या. दोन दिवसांत कामगारांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला.

काम देण्यासह न्यायाचे अधिकार्‍यांचे आश्‍वासन
खाजगी स्वच्छता कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाची दखल भाजप वैद्यकिय आघाडीचे डॉ.नि.तू. पाटील यांनी घेत रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी डॉ. पाटील यांनी 18 अन्यायग्रस्त कामगारांसोबत कार्मिक अधिकारी तुशाबा शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. तीन वर्षातील पूर्ण वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधीचे खाते काढून रूजू झाल्यापासून निधी त्यात वर्ग करावा यासह विविध मागण्यांसंदर्भात निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. ज्या कामगारांनी या विषयी आवाज उठवला त्यांना आकसापोटी कामावरुन कमी करण्यात आले आहे, त्यांना नवीन कामात घेण्यात यावे, सदर ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर शिंदे यांनी दोन दिवसांत सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल व कामगारांना नवीन कंत्राटदाराकडे कामही दिले जाईल, असे आश्वासन दिल्याने कामगार सुखावले तर कर्मचार्‍यांचे शोषण करणार्‍या चंबल सिक्युरिटी आणि नवीन कंत्राटदाराचे धाबे दणाणले असल्याचे डॉ.पाटील कळवतात.