श्रीनगर : उत्तर काश्मिरातील बारामुला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या भागात आणखीही दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे लष्करी जवानांनी या भागात जोरदार शोधमोहीम हाती घेतली होती.
पोलिस सूत्राच्या माहितीनुसार, सोपोर भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार जोरदार शोधमोहीम राबविण्यात आली. काही जणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर जवानांनी त्यांना शरण येण्याचा इशारा दिला. तथापि, त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला तर अन्य दहशतवादी पळून गेले. त्यांचाही शोध घेतला जात होता. यापूर्वी शनिवारी चोगुल हंदवाडा भागात पोलिसांच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात पोलिस शिपाई अब्दुल करीम शेख हे शहीद झाले होते. त्यानंतर दक्षिण काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पुन्हा अशांतता पसरली होती. मागील काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर वारंवार जमाव रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, रविवारी पहिल्यांदाच पोलिस शिपायाच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात जमाव दिसून आला होता.