चकली चोरी म्हणून दोन मुलांची काढली अर्धनग्न धिंड

0

उल्हासनगर: दुकानात चकलीची चोरी केली म्हणून दोन लहान मुलांना त्यांचे अर्धे केश कापून चपलाचा हार घालून त्यांची परिसरात अर्धनग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली. ही दोन्ही मुले 8 आणि 9 वर्षांची असून त्यांची धिंड काढतांनाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी या मुलांच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास हे दोघे मुले घराबाहेर खेळत होते. मात्र, जवळ असलेला किराणा मालाच्या दुकानात चकली चोरी केली, म्हणून दुकान मालक असलेले दोघे भाऊ इरफान आणि तबकल पठाण या दोघांनी या दोन्ही लहान मुलांना चकली चोरताना पकडले आणि त्यांचे केश अर्धे कापले, चपलांचा हार घातला, परिसरात या लहान मुलांची अर्धनग्न धिंड काढली, एवढेच नव्हे तर इरफान या मुलांना मारहाण करत होता तेव्हा त्याचा भाऊ तबकल पठाण या सर्व कृत्याचा मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होता. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये पसरवून टाकला. मात्र, दोन्ही मुलांची आई जेव्हा कामावरून संध्याकाळी घरी आली, तेव्हा तिला हा सर्व प्रकार समजला. त्याच वेळी तिने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला.

दरम्यान, भारिपचे माजी शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांना याविषयी विचारले असता खेळता खेळता त्या दोन लहान मुलांना भूक लागली असेल म्हणून त्यांनी एखादी चकली चोरली असेल, तर त्या लहान मुलांना एवढी मोठी शिक्षा देणे हे चुकीचे आहे, असे सांगितले.

याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने या दोघे या आरोपींवर पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून, या घाणेरड्या कृत्यामध्ये अजून कोणी आरोपी आहे का, याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या लहान मुलांना अघोरी शिक्षा देणार्‍या या दोन विकृत भावांना कायदा काय शिक्षा देते, हे आता पाहावे लागेल.

त्या दोघांना पोक्सा लावला
यासंदर्भात हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांना विचारले असता या दोन्ही आरोपींवर पोक्साअंतर्गत व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली व बालकांचे लैंगिक गुह्यांपासून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटकही करण्यात आल्याची माहिती दिली.