नवी दिल्ली-काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणे पक्षासाठी कठिण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी पक्षाला एक सल्ला दिला आहे.
I don’t think we need to be embarrassed about acknowledging that @incIndia is facing a funding crunch: https://t.co/BnAoXYEw44 We should call on all concerned citizens to help us face the moneybags of the BJP
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 23, 2018
काँग्रेसने आपण आर्थिक संकटात आहोत हे वास्तव स्वीकारले पाहिजे. त्यात काहीही कमीपणा नाही. भाजपाकडे ज्या पैशांच्या थैल्या आहेत त्याचा सामना करण्यासाठी जागरुक नागरिकांना मदतीचे आवाहन केले पाहिजे असे टि्वट थरुर यांनी केले आहे. मागच्या पाच महिन्यांपासून काँग्रेसने विविध राज्यांमध्ये कार्यालय चालवण्यासाठी लागणारा निधी देणे बंद केले आहे असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षामध्ये व्यावसायीकांकडून येणाऱ्या निधीमध्ये घट झाली आहे. सध्या काँग्रेसकडे पैशाची इतकी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, त्यांना त्यांच्या एका उमेदवाराच्या मदतीसाठी वर्गणी मागून पैसा जमा करावा लागला होता.