चक्क… पोलीस अधिक्षकांचीच फसवणूक

0

जम्मूच्या उपपोलीस अधीक्षकाला ग्राहक न्यायालयाचा दणका

नुकसान भरपाई देण्याचे आदेश

(किशोर पाटील)

जळगाव- जळगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक तथा अमरावती येथील एसआरपीएफच कमाडंट लोहीत मतानी यांनी लिहिलेल्या ’इंटरनॅशनल सिक्युरीटी कन्सेप्ट, डायनॅमिक चॅलेंजेस’ पुस्तकाच्या जाहिरात व विक्रीसाठी त्यांनी जम्मू काश्मिरातील नोराकल पब्लिकेशन यांच्यासोबत ऑनलाईन करार केला होता. या करारानुसार प्रकाशकाने विक्रीही केली नाही व जाहिरातही केली नाही. यानंतर लेखक मतानी यांना पुस्तकाची मूळ प्रत देण्यास नकार दिला होता. याबाबत मतानी यांनी जळगाव ग्राहक न्यायालयात धाव घेवून तक्रार केली होती. त्यानुसार ग्राहक मंचाने जम्मू काश्मिरातील उपपोलीस अधीक्षक प्रणव महाजन यांच्या नोराकल प्रकाशनला दणका दिला असून मतानी यांना नुकसान भरपाई म्हणून 4 लाख 98 हजार रुपये तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख 98 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान,अशा प्रकारचा ग्राहक मंचचा निकाल हा राज्यातील पहिलाच असल्याचा दावा आयपीएस अधिकारी मतानी यांनी केला आहे.

मित्राच्या ओळखीतून जम्मूतील प्रकाशकाशी संपर्क

अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित तीन पुस्तके लिहिली आहे. त्यातील एक पुस्तक म्हणजे ‘इंटरनॅशनल सिक्युरीटी कन्सेप्ट, डायनॅमिक चॅलेंजेस’ होय. या पुस्तकाचे मतानी यांना प्रकाशन करुन त्याची विक्री व जाहिरात करावयाची होती. यासाठी मतानी यांनी मित्राच्या माध्यमातून जम्मू काश्मिरमधील राजौरी जिल्ह्याचे उपपोलीस अधीक्षक प्रणव महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःच्याच आईचे नावे म्हणजेच वेद महाजन यांच्या नावे असलेल्या नोराकल पब्लिकेशन सोबत करार करण्याचे सांगितले. याबाबत उपपोलीस अधीक्षकांनीच मतानी यांना वेळोवेळी मेल, तसेच संपर्क केला होता.

असा होता पुस्तक प्रकाशनासंदर्भातील करार

आयपीएस दर्जाचे उपपोलीस अधीक्षक महाजन यांच्यावर विश्‍वास ठेवून लोहीत मतानी यांनी 22 सप्टेंबर 2016 रोजी नोराकल प्रकाशन सोबत ऑनलाईन पध्दतीने करार केला होता. मेलवरुन आलेल्या करारावर मतानी यांनीही मेलव्दारेच स्वाक्षरी करुन तो पाठविला होता. करारानुसार मतानी यांचे पुस्तक नोराकल पब्लिकेशनने छापून देणे, तसेच त्याची विक्री संपूर्ण देशाच्या कानाकोपर्‍यात करणे, यानंतर पहिल्या 20 हजार पुस्तक प्रतिच्या विक्रीतून 10 टक्के रॉयल्टी लेखक मतानी यांना देणे तसेच पुढील 30 हजार पुस्तक विक्रीतून 12 टक्के रॉयल्टी व त्यापुढील पुस्तक विक्रीतून 15 टक्के रॉयल्टी लेखक मतानी यांना देण्याचे ठरलेले होेते.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहक न्यायालयात तक्रार

करारानुसार पब्लिकेशनने कुठल्याही प्रकारे पुस्तकाची विक्री केली नाही, तसेच पुस्तक विक्रीतून रॉयल्टीची रक्कम दिली नाही, याबाबत मतानी यांनी पब्लिकेशनचे वेद महाजन यांच्यासह उपपोलीस अधीक्षक महाजन यांच्याशी संपर्क साधला. चौकशी करुन जानेवारी 2017 ते जून 2017 दरम्यानचे पुस्तक विक्रीतून रॉयल्टीचे 40 हजार रुपये खात्यात जमा करावयास सांगितले. व पुस्तक विक्रीबाबत सविस्तर तपशील देण्यास सांगितले. मात्र प्रकाशक वेद महाजन व उपपोलीस अधीक्षक प्रकाश महाजन यांनी कुठलीही माहिती दिली नाही. या पुस्तकाची ऑनलाईन वेबसाईट अथवा कुठेही जाहीरात केलेली नव्हती. यानंतर नोराकल पब्लिकेशनीची माहिती काढल्ी असता, या पब्लिकेशनला शासनमान्य आयएसबी नंबर व अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आल्यावर मतानी यांना धक्काच बसला. पब्लिकेशनकडून कुठलेही उत्तर अथवा प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक होत असल्याची खात्री झाल्यावर मतानी यांनी याबाबत जिल्हा जळगाव ग्राहक न्यायालयात तक्रार केली. व वकीलामार्फत पब्लिकेशनचे वेद महाजन, उपपोलीस अधीक्षक प्रकाश महाजन यांना नोटीसही पाठविली.

लेखक मतानी यांना मिळणार सहा लाखाची नुकसान भरपाई

ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या पुमन मलीक, सुरेश जाधव यांच्यासमोर हा खटला चालला. यात वकीलांचा युक्तीवाद व कागदोपत्री पुराव्यानुसार अध्यक्षांनी 11 ऑक्टोंबर रोजी निकाल दिला. कराराच्या अर्टी शर्तीचे भंग केल्याने नोराकल प्रकाशनचे वेद महाजन व उपपोलीस अधीक्षक प्रकाश महाजन यांनी मतानी यांना 22 सप्टेंबर 2016 पासून दोन वर्षाचे रॉयल्टीपोटी 4 लाख 98 हजार रुपये दर साल दर शेकडा 9 टक्के व्याजासह रक्कम द्यावी, तसेच मतानी यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख 98 हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले आहे. मतानी यांच्यातर्फे अ‍ॅड. हेमंत भंगाळे यांनी तर प्रकाशक महाजन यांच्यातर्फे अ‍ॅड. पद्नाभ देशपांडे यांनी काम पाहिले. मतानी यांच्या पत्नी मनजीत कौर हया कायद्याचे शिक्षण घेत असून या केसमध्ये त्यांनी सखोल अभ्यास करुन, वकीलांना सहकार्य केले. वकील होण्यापूर्वीच आपले पती मतानी यांच्या केसचा अ÷भ्यास करुन पहिलीच केस जिंकली.

एका लेखकासाठी त्याची लेखनसंपदा हीच मोठी संपत्ती असते. न्यायालयाकडून न्याय मिळाला. नुकसान भरपाईपेक्षा महत्वाची लेखनसंपदा असलेले पुस्तक 3 वर्षाच्या न्यायायलीन लढाईनंतर परत मिळाले. मला त्याचा खूप आनंद आहे.

लोहीत मतानी, कमान्डंन्ट, केंद्रीय राखीव दल, अमरावती