चक्क माशासारखे बाळ आले जन्माला; मात्र १५ मिनिटात झाला मृत्यू

0

बीड : बीडमधील अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात मत्स्यपरीच्या रुपातील बाळाचा जन्म झाला. पण जन्माच्या अवघ्या १५ मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात आज सकाळी ९ वाजता दोन पायांऐवजी एकच पाय आणि लिंग नसलेल्या बाळाचा जन्म झाला. वैद्यकीय परिभाषेत याला सिरेनोमेलिया म्हणतात. सिरेनोमेलियाला मर्मेड सिंड्रोमही (मत्स्यपरी) म्हटले जाते. लाखात एक असे उदाहरण पाहायला मिळते, असे डॉक्टरांनी सांगितले.

पट्टीवडगाव इथल्या एक महिलेला काल सायंकाळी अंबाजोगाई रुग्णालायत प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ८ च्या  सुमारास तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. प्रसुती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डॉ. प्रियंका खराणे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी तिची प्रसूती केली. साधारणपणे सकाळी ९ च्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला.

एकच पाय आणि लिंग नाही 

हे बाळ बाहेर येत असतानाच एका अजब घटनेचे साक्षीदार बनणार आहोत, याची कल्पना उपस्थित डॉक्टरांना आली. दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेलं हे बाळ असल्याचं डॉक्टरांनी पाहिले. या महिलेची प्रसूती नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघ्या 15 मिनिटांचेच आयुष्य मिळाले.

सोनोग्राफी नाही केली

या बाळाला जन्म देणारी महिला ऊसतोड कामगार आहे. या माताने गर्भधारणेनंतर कोणतेही औषधोपचार घेतलेले नाही. शिवाय नऊ महिन्यात एकदाही तपासणी केली नसल्याने, बाळाच्या शरीराबाबत तिला माहितीच नव्हती. एकीकडे आरोग्य विभाग गरोदर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असल्याचे  सांगत आहे. मात्र या महिलेच्या उदाहरणावरुन तिची सोनोग्राफी टेस्ट झाली नव्हती, हेच स्पष्ट होते.

हे बाळ आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागातील म्युझियममध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.