पिंपरी-चिंचवड : आकुर्डी येथील एका नामांकित भव्य महाविद्यालयात एक मठाधीश बाबांचे प्रवचन आयोजित केले होते. याची माहिती समजताच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला. मात्र, प्राचार्य व संचालकांनी विरोध मोडून काढत त्यांना व्याख्यानांना आमंत्रीत केलेच. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याकडून शंभर रुपये व प्राध्यापकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये निधी गोळा करत मुळशीतील मठाला दिला. या महाविद्यालयात दहा हजार विद्यार्थी आहे. बुवाबाजीचे व्याख्यान आणि सक्तीची पैसे वसुली याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरात चर्चेचा विषय
पेपर फुटी प्रकरण, अमराठी प्राध्यापकांकडून वर्गाकडून मराठी विदयांर्थ्यांना दिला जाणारा त्रास, लेखी परिक्षेत चांगले मार्क मिळवुनही जाणीवपूर्वक प्रॅक्टीकलमध्ये कमी मार्क देऊन मुलांना नापास करणे, पेपर कॉपी मिळण्यासाठी पैसे देऊनही कॉलेजकडून ते वेळेवर विद्यापीठाला जाणीव पुर्वक न भरणे अशा विविध प्रकारामुळे हे महाविद्यालय आणि त्याचा कॅम्पस अगोदरच बदनाम झाला आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
विद्यार्थ्यांचा विरोध काढला मोडीत
काही दिवसांपूर्वी शहराजवळच्याच एका महाराजाचे व्याख्यान ठेवण्यात आले. पण याची माहिती मिळताच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रामरहिम व इतर बाबामहारांच्या प्रकरणामुळे या व्याख्यानाला विरोध केला. तसेच आम्हाला आमच्या शैक्षणिक करिअर विषयक व्याख्यान असेल तरच आमचा वेळ घ्या असे ठणकावून सांगितले. परंतु, स्थानिक शैक्षणिक व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांना बळजबरीने या व्याख्यानासाठी सभागृहात बसवले. एवढेच नाहीतर व्याख्यान झाल्यावर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये बाबांच्या मठास निधी स्वरुपात देण्याची ताकीदही दिली. पण पैसे देऊनही याबाबत कोणतीच पावती न दिल्यामूळे मात्र विद्यार्थी अधिकच संतप्त झाले होते. मात्र, प्राचार्यांनी प्रॅक्टीकलच्या मार्काची आठवण करुन देत प्रत्येकाला निधी देण्यास सांगितले. तसेच प्राध्यपक वर्गाला देखील महाराजाच्या मठास भेट देण्याचे बंधन घातले. त्यामुळे प्राध्यापकांनी देखील इच्छेविरूद्ध काही लाख निधी देऊन दोन दिवस या मठात घालवले. मठात राहण्यासाठी ड्रेस कोड असल्याने तो ड्रेस घेण्यासाठी पुन्हा काही हजार खर्च करावे लागले. या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी महिलावर्गाला आपली लहान-लहान मुले घरात ठेवून जावे लागले. हा सारा प्रकारच संतापदायी आहे.
स्थानिक व्यवस्थापन समिती जबाबदार
या सार्याला येथील स्थानिक व्यवस्थापन समिती व येथील कॉलेजचे अनेक प्राचार्य व संचालक निवृत्त कर्नल जबाबदार असल्याचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या सर्व प्रकरणामुळे पालक वर्ग मात्र संतप्त झाला आहे. नेहमीच संस्थेकडून कोणत्याना कोणत्या कारणांसाठी पैसे गोळा केले जात असतात. मुळात ऐपत नसतानाही शिक्षणासाठी आम्ही लाखो रुपये संस्थेला देतो. पण संस्थेकडून इतरही कारणासाठी नेहमीच पैशाची मागणी होत असल्याने संस्थेच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे. याबाबत संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
पेपरफुटी मधील दोषी कर्मचारी अद्यापही कार्यरत
एप्रिल व मे 2017 मध्ये झालेल्या परिक्षेत काही विषयांचे पेपर फुटले होते. तेव्हा या पेपर फुटीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. यामुळे कष्टकरी हुषार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाने या कॉलेजमधील परिक्षा केंद्रावर तीन वर्षाची बंदी आहे. साहजिकच कॉलेजच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाने पाठवलेली प्रश्नपत्रीकाची झेरॉक्स काढून परिक्षावर्गावरील पर्यवेक्षकांना देण्याअगोदरच ती प्रश्नपत्रिका परिक्षा वर्गाबाहेर गेल्यानेच पेपर फुटले होते. या फुटीच्या प्रकरणास कारणीभुत असलेल्या परिक्षा विभागातील चार कर्मचारी व विभाग प्रमुख संस्थेत अद्यापही कार्यरत आहेत. संस्थेने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने विद्यार्थी व पालक वर्गात आश्चर्य व्यक्त होत आहे. असे प्रकार संस्था धार्जीणच असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केला आहे.