तोही विलेपार्ल्यात. नंतर झालेही तेथे. मात्र, सन 1990मध्ये कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं. अगदी पार्ल्यावर जर कुणी जगात जळणारं असलं, तरी तेही तशी कल्पना करू शकत नव्हते, असं शांत होतं पार्ले. मात्र, त्याच पार्ल्यात स्फोटाची बातमी आली. तीही समाजासाठी समर्पित पत्रकारिता करणारे संपादक माधव गडकरींच्या दाराबाहेर. सारेच हादरले. मात्र, आणखी जास्त हादरले तेव्हा जेव्हा पार्ल्यातील त्या स्फोटासाठी एका पार्लेकरालाच अटक झाली. कुणाचंही कुतूहल चाळवणारा विषय. मात्र, काळाच्या उदरात अनेक गोष्टी विस्मृतीच्या कृष्णविवरात दडपल्या जातात तसंच या घटनेचंही झालं. पण एकदा माझे पार्लेकर मित्र नितीन डिचोलकर यांच्याशी गप्पा मारताना सहज विषय निघाला आणि ते बोलून गेले, अहो! तो आमचा अभिमन्यू! खूप भोगलं त्याने. नितीन शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी. त्यांचा घरोघरी, दारोदारी वावर. त्यांनी अभिमन्यूचा मोबाइल नंबर मिळवून दिला.
अभिमन्यूशी बोललो काही वर्षांपूर्वी. तेव्हापासून बोलतच असतो. एक जखम ठसठसलेली तशीच ठसठसताना दिसते. अभिमन्यूशी बोलताना सहजच त्यांचं महाभारत उलगडलं गेलं. सुरुवात नावापासूनच. आईला अभिमन्यू हे नाव मान्यच नव्हतं. मात्र, वडिलांच्या हट्टापायी तिचा नाइलाज झाला. तिचा अकाली मृत्यू ओढवला आणि अभिमन्यूचा चक्रव्यूहात प्रवेशही. वडिलांनी लग्नांची मालिका सुरू झाली. त्याचबरोबर अभिमन्यूचा छळही. लहानपणापासूनच सावत्रपणाचा त्रास. त्यातच मग पौगंडावस्थेतील नैसर्गिक बंडखोरीवर द्वाडपणाऐवजी गुन्हेगारी वागण्याची घरातल्यांकडूनच खोटी बदनामी. वडील पार्लेकर. संघाचे कडवट स्वयंसेवक. मुलासाठी संघ शाखेत जाणे सक्तीचं. त्यातूनच पुढे उत्कर्ष मंडळातून रायफल प्रशिक्षण घेतले. त्यासाठी एअर गन घेतली, तर वडिलांनीच एअर गनसह पोलीस ठाण्यात जमा केले. पहिली गुन्हेगारी नोंद झाली. चक्रव्यूहाचे फेरे वाढतच होते. त्यातच नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाने वातावरण तापू लागले. “जिस हिंदू का खून ना खौले, वह खून नहीं है पानी है”, अशा घोषणांनी चेव चढले नव्हते असे कोण होते! अभावानेच तशी लोक होती. त्यापैकीच एक होते ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी. त्यांनी संघविरोधात भूमिका घेतली होती. त्यातच 20 डिसेंबरच्या रात्री पार्ल्यातील त्यांच्या घराबाहेर स्फोट झाला. गडकरीसाहेब घरी नव्हते. ते साहित्य संमेलनास गेले होते. स्फोटही तसा किरकोळच होता. पण मोठ्या माणसाच्या घराबाहेरचा स्फोट असल्याने प्रकरण मोठे झाले. स्थानिक पोलिसांवर दबाव आला. पोलिसांनी तपास सुरू केला.
अभिमन्यूंच्या शब्दात सांगायचे तर तपासाच्या नावाखाली बकरा शोधायला सुरुवात केली. त्यात सापडले एक नाव अभिमन्यूचे. अगदी सीव्ही कसा तंतोतंत जुळणारा. हिस्ट्रीशिटर म्हणता येईल असा. संघ विचारधारेचा. जनता दलाच्या सोळंकी नावाच्या नगरसेवकाला मारहाणीचा आरोप असलेला. वडिलांनीच एअर गनसह जीवे मारण्याची धमकी देतो अशा तक्रारीसह पोलीस ठाण्यात जमा केलेला. त्यामुळे स्वाभाविकच पोलिसांनी अभिमन्यूला अटक केली. अकरा दिवस गजाआड राहावे लागले. बाहेर आल्यावर जगच बदलले होते. पार्ल्याच्या मध्यमवर्गीय समाजाने त्याला स्फोटातील गुन्हेगार मानून दूर लोटणे स्वाभाविकच होते, पण तो ज्या संघ विचारांसाठी कार्यरत होता त्यांनाही त्याच्या निर्दोषत्वाची खात्री असूनही तू आता संघाचे काम करू नको, असे सांगून एकप्रकारे वाळीतच टाकले. ही जखम जास्त खोलवरची झाली, तरीही अभिमन्यूने ती वेदना पचवली.
त्यानंतर सुरू झाला तुरुंगवासाचा आणि अटकेची मालिकाच सुरू झाली. त्यामुळे गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या अभिमन्यूची फरफट सुरू झाली. मुंबईतील दंगलीनंतर पोलिसांनी सन 1993मध्ये रासुकाखाली अटक केली. त्यातून पुढे मुक्तता झाली. त्यानंतर पुन्हा सन 2005मध्ये ऑर्थर रोड कारागृहाची वारी त्याला जवळ-जवळ उद्ध्वस्त करणारीच होती. कारागृहातील ते दिवस विसरणे त्याला शक्यच नाही. तेथे असताना त्याने वैतागून पार्ले स्फोट प्रकरणात माफीचा साक्षीदार व्हायचं आहे असा अर्ज केला. त्याने काही बड्या नेत्यांची नावेही घेतली होती आणि मग कुणी विचारही करणार नाही ते घडले. कारागृहातील अट्टल गुन्हेगारांनी त्याला घेरले. जमिनीवर पाडले. त्याच्या गुदद्वारात रबरी चेंडू ढकलण्यात आला. त्या वेदना, तो त्रास, शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडचा…, अभिमन्यूला आजही सांगताना पाहणे त्रासदायक असते. पुढे रुग्णालयात तो चेंडू शस्त्रक्रिया करून काढावा लागला. मात्र, शारीरिक त्रास सुरू झाला तो कायमचाच! तीन शस्त्रक्रियांनंतरही!
अभिमन्यूसाठी चक्रव्यूहात काही दिलाशाचे कवडसेही होते. सर्वात मोठा दिलासा शिवडी न्यायालयाने दिला. न्या. पी. आर. बेलोरकर यांच्यासमोर स्फोटाचा खटला चालला. पोलिसांनी साक्षीदार उभे केले.
अभिमन्यूच्या घरात सापडलेले खिळे, टेपरेकॉर्डरचे काही भाग, कॅमेरा वगैरे सादर करून पुरावा असल्याचा दावा केला. मात्र, न्यायाधीशांनी पोलिसांचा पुरावा आरोप सिद्ध करण्यास पुरेसा नसल्याचे बजावत न्यायालयाने पुराव्याअभावी अभिमन्यूची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष मुक्ततेलाही बराच काळ लोटला. मात्र, अभिमन्यूची लढाई संपलेली नाही. पोलिसांनी त्याच्यावर पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदवला होता, तो सुरूच आहे तसेच त्याने पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत तक्रार केली होती, तो पोलिसांविरोधातील खटलाही. त्यातून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत या अभिमन्यूला मनासारखं ओझ्याविना जगता येणार नाही. त्याला खात्री आहे. न्यायालय याहीवेळी त्याला न्याय देईल. मात्र, तरीही कुठेतरी त्याच्या मनातील एक खदखद उफाळून येते…हे सारे माझ्याच बाबतीत का घडले? गडकरी स्फोट प्रकरणात माझ्या जीवनाची विनाकारण वाताहत झाली त्याला जबाबदार कोण? आताही तो रत्नागिरीतील गावच्या जमिनीसाठी राजकारण्यांशी लढतो आहे. तो संघर्ष आणखी वेगळाच.
अभिमन्यूसारखे इतरही अनेक अभिमन्यू आपल्या सभोवताली असतात. ज्यांचा लढा एकाकी सुरू असतो. ते चक्रव्यूहातच संपणे समाजासाठीही योग्य नसते. अशा अभिमन्यूंना गरज असते आपल्या साथीची. तुम्ही देणार ना? नाहीतर मग महाभारतातील अभिमन्यूच्या शौर्याचं कौतुक करण्याचा अधिकार आपण गमावलेला असेल, एवढे नक्की!
निर्दोष मुक्ततेलाही बराच काळ लोटला. मात्र, अभिमन्यूची लढाई संपलेली नाही. पोलिसांनी त्याच्यावर पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदवला होता. तो सुरूच आहे तसेच त्याने पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत तक्रार केली होती, तो पोलिसांविरोधातील खटलाही. त्यातून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत या अभिमन्यूला मनासारखं ओझ्याविना जगता येणार नाही.
तुळशीदास भोईटे – 9833794961